पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली आहे. या कोंडीची नेमकी कारणे शोधण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांसह आयटीयन्सनी संयुक्त सर्वेक्षण केले. त्याचबरोबर कोंडी होणाऱ्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनाही निश्चित करण्यात आल्या. लवकरच शासकीय यंत्रणांकडून या उपाययोजना केल्या जाणार असल्याने आयटी पार्क कोंडीमुक्त होण्याची अपेक्षा आहे.
हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीसह नागरी समस्या सोडविण्यासाठी आयटीयन्सनी ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ ही मोहीम राबविली होती. ही ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम होती. त्यात सुमारे २५ हजारांहून अधिक आयटीयन्सनी सहभाग नोंदविला. आयटी पार्कमधील नागरी समस्यांचा मुद्दा वारंवार प्रकर्षाने समोर येऊ लागल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० जुलैला उच्चस्तरीय बैठक घ्यावी लागली. या बैठकीत त्यांनी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आणि आयटीयन्सच्या पथकाने १९ जुलैला संयुक्त सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणादरम्यान आयटी पार्क परिसरातील कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणी काय उपाययोजना कराव्या लागतील, याची चर्चा करण्यात आली. आयटी पार्क परिसरातील कोंडीची ठिकाणे आणि त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजना यांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे लवकरच शासकीय यंत्रणांकडून उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
वाकड-पिंपरी चिंचवड रेसिडंट्स डेव्हलपमेंट अँड वेलफेअर असोसिएशनचे सचिन लोंढे यांनी ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ ही मोहीम सुरू केली होती. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या उपाययोजनांबद्दल ते म्हणाले, ‘हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी ठिकाणे सर्वेक्षणादरम्यान निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी पोर्टेबल सिग्नल, वाहतूक पोलीस अथवा वॉर्डनची नियुक्ती, दुभाजक बसवणे, काही चौकांत प्रवेश बंद करणे, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण मिळवणे, तसेच डावीकडील मुक्त मार्ग यांसारख्या विविध उपाययोजना करण्याचे ठरले आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यांत हिंजवडीतील वाहतूक विभागाला मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार या उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.’
आयटी पार्क परिसरातील कोंडीची ठिकाणे
- मधुबन हॉटेल चौक (इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ)
- शेल पेट्रोल पंप चौक (छत्रपती शिवाजी महाराज चौकापूर्वी)
- छत्रपती शिवाजी महाराज चौक (मुख्य चौक)
- पांडवनगर चौक (टाटा टेक्नॉलॉजीज/ इन्फोसिस सर्कलजवळ)
- माणदेवी मंदिर रस्ता (आयटी पार्क टप्पा तीनजवळ)
- एसईझेड भवन वर्तुळ (आयटी पार्क टप्पा तीन)
- विप्रो टप्पा दोन वर्तुळ
- क्रोमा चौक/ॲमस्टरडॅम हॉटेल चौक
- माइंडट्री कन्सल्टिंग चौकाजवळील जंक्शन
- हिंजवडी पुलाखालील सेवा रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग (भुजबळ चौक)