scorecardresearch

पुणे: आता कैदीही बोलणार संतांची वाणी; कारागृहात रंगणार राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा

राज्यभरातील कारागृहांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे बंदिजन आता टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग आणि भजन गायन करणार आहेत.

(प्रातिनिधीक फोटो)

राज्यभरातील कारागृहांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे बंदिजन आता टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग आणि भजन गायन करणार आहेत. बंदिजनांमधील कलागुणांना वाव मिळावाआणि त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार वाढीस लागावा, तसेच थोडा विरंगुळा मिळावा, म्हणून कारागृहांत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धेचं आयोजन करण्यातआलं आहे. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे १ ते ३० जून या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचं निमित्त साधून कारागृहातील बंदिजनांसाठी आयोजित या स्पर्धेत २७ संघ सहभागी होणार आहेत. गृह विभागाने एका अध्यादेशाद्वारे कारागृहातील बंदिजनांसाठी ही स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि तुरुंग महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली जात आहे.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, बापूसाहेब मोरे-देहूकर, डॉ. रामचंद्र देखणे, नितीन महाराज मोरे आणि योगेश देसाई यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. बंदिजनांसाठी आयोजित केलेली ही देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव आणि पहिलीच स्पर्धा असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी सोमवारी सांगितलं. या स्पर्धेसाठी येरवडा कारागृहातील बंदिजनांना प्रसिद्ध गायक रघुनाथ खंडाळकर प्रशिक्षण देत आहेत.

स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघांना कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ संघांना दीना आणि प्रकाश धारिवाल यांच्या वतीने संवादिनी, तबला, पखवाज, सहा जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची फ्रेम आणि प्रेरणायादी शंभर पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jagadguru shri sant tukaram maharaj state level abhang bhajan competition organize for prisoner in maharashtra pune print news rmm

ताज्या बातम्या