महाराष्ट्राचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या प्राचीन खंडोबा मंदिरातील मुख्य दगडी छताच्या आधारासाठी असलेल्या दगडी तुळयांना काही ठिकाणी तडे गेले असल्याने मंदिराला धोका निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून गाभाऱ्यावरील छत धोकादायक अवस्थेत असून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
पावसाळ्यात या छतामधून मंदिराच्या गाभाऱ्यात व गडकोटाच्या ओवऱ्यामध्येही मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होते. शासनाने पाच वर्षांपूर्वी खंडोबा गड जतन करण्यासाठी व भाविकांच्या सुविधांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कामे सुरू करण्यात आली. संरक्षक भिंत, पर्यायी पायरी मार्ग, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात आली. मात्र सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या गडाच्या दुरुस्तीच्या कामाला मात्र अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. वास्तविक मुख्य मंदिराच्या छताची दुरुस्ती व गडकोटाचे वॉटरप्रूफिंग ही कामे प्राधान्याने पहिल्या टप्प्यात होण्याची गरज होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यापूर्वी झालेल्या भूकंपामध्ये गडाच्या पायऱ्यांवरील काही दीपमाळा कोसळून पडल्याची उदाहरणे आहेत. मुख्य मंदिराचा सभामंडप राघो मंबाजी यांनी इ.स. १६३७ मध्ये बांधला असून इ.स. १७४० मध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांनी परिवारासह भेट देऊन जेजुरीच्या मंदिराचा तट व दीपस्तंभ बांधल्याचा इतिहास आहे. मुख्य स्वयंभू िलगाच्या मंदिरावर शिखरामध्ये महादेवाचे शिविलग आहे. महाशिवरात्रीला शिडी लावून हजारो भाविक धोकादायक छतावरूनच या शिविलगाच्या दर्शनासाठी जातात. या छताला खालून तडे गेलेले असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मंदिराच्या अवाढव्य दगडी खांबांना नेमके तडे कधी गेले या विषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. या गाभाऱ्यात भाविकांची कायम गर्दी असते. येथील वास्तूंचे जतन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. स्थापत्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे होण्याची गरज आहे. ‘जय मल्हार’ मालिकेमुळे खंडोबाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून गडावर कायम गर्दी असते. गडाच्या अध्र्या वाटेवर असणाऱ्या बानुदेवीच्या मंदिरातसुद्धा मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होत असते. खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळ, जेजुरीतील ग्रामस्थ, सामाजिक संस्था, इतिहास तज्ज्ञ यांचे सहकार्य घेऊन कामे केल्यास अधिक फायद्याचे ठरणार आहे. 
दप्तर दिरंगाईमुळे विकासकामे रखडली
खंडोबा मंदिराच्या गडकोटांचे सज्जा, सभामंडप, मुख्य मंदिर कळसाच्या बाजूचे वॉटर प्रूिफग करणे, दसरा पालखीसोहळा प्रदक्षिणा मार्गावर पेिव्हग ब्लॉक बसवणे आदी कामांसाठी राज्य शासनाकडून सुमारे एक कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जेजुरी नगरपालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे या कामास विलंब होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jejuri ceiling danger
First published on: 07-06-2015 at 03:40 IST