पुणे : उन्हाच्या झळांसोबत बाजारात लिंबाचे दरही वाढत आहेत. मागील महिनाभरापासून नगर, सोलापुरात लिंबाचे दर प्रति क्विंटल दहा हजार रुपयांवर गेले आहेत. राज्याच्या अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र लिंबाच्या दरात चढ-उतार होत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार,  फेबुवारी अखेरीस नागपूर, नगर आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लिंबाचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे लिंबाच्या दरात चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पडझड झाली होती.अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे लिंबाचे नुकसान झाले होते. त्यामुळे लिंबाचा तुटवडा होऊन एप्रिलच्या मध्यानंतर पुन्हा लिंबाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. राज्यात प्रामुख्याने लिंबाचे उत्पादन नगर, सोलापूर, जळगाव, पुणे, सांगली, धुळे, अकोला आणि नाशिक जिल्ह्यांत होते.

हेही वाचा >>>शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा

शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी सोलापूर बाजार समितीत नऊ हजार रुपये प्रति क्विंटल, नगर बाजार समितीत दहा हजार प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा हजार प्रति क्विंटल, मुंबईत चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि पुणे बाजार समितीत ४,५०० रुपये प्रति क्विंटल दर होता.पुणे, मुंबईला नगर, सोलापूर, नाशिकमधून लिंबाचा पुरवठा होतो. शुक्रवारी पुण्यात २० किलोच्या गोणीला १५०० ते २००० रुपये दर मिळाला. एका गोणीत पाचशे ते सहाशे लिंबू बसतात. किरकोळ बाजारात एक लिंबू पाच ते सात रुपयांनी विक्री होत आहे. – रोहन जाधव, भाजीपाला व्यापारी, पुणे बाजार समिती