‘अरे चाटून खा भाजपा, पुसून खा भाजपा, चुरून खा भाजपा, खरडून खा भाजपा’ अशा प्रकारच्या घोषणा देत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीने महानगर पालिकेतच पाणीदरवाढीला विरोध केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये आज राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेने एकत्र येत सत्ताधारी भाजपच्या पाणीदरवाढीच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनामुळे आजची नियोजित सर्वसाधरण सभा तहकूब करण्यात आली. शहरातील अनेक भागांत कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यातच पालिका प्रशासनाने पाणीपट्टीत दरवाढ केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सर्वसाधारण सभेच्या मुहूर्तावर महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर मनसेने पाणी पट्टी दरवाढ विरोधात निषेध आंदोलन सुरु केले. त्यानंतर शिवसेनाही याच जागी आंदोलन करणार होती मात्र शिवसेनेच्या आंदोलनाकांनी मनसेच्या आंदोलकांबरोबर घोषणाबाजी सुरु करत आंदोलनात सहभाग नोंदवला. मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आंदोलन करताना दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं राजकारणात पटत नसलं तरी, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हे दोन्ही पक्ष एकत्र दिसत आहेत. तर महानगर पालिकेच्या आत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी (पाणी पिण्याचा) तांब्या वाजवून पाणी दरवाढ विरोधात आंदोलन केले. आंदोलनाबरोबरच आयुक्त श्रावण हार्डीकर यांना अडवण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे पोलीस, पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार झटापट झाल्याने वातावरण थोडे तणावपूर्ण झाले होते.

पाणी दरवाढ विरोधात कोणत्याही गटनेत्यांना सूचना दिल्या नव्हत्या, अचानक हुकूमशाही पद्धतीने पाणी दरवाढ करण्यात आली. याविषयी आम्ही आयुक्तांना कल्पना दिली होती. पाणी दरवाढीचा आम्ही निषेध करत आहोत. पाणी दरवाढ रद्द केली नाही तर पाणीपुरवठा कार्यालय राहणार नाही असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. तर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलीस गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joint protest in premises of pimpri chinchwad municipal corporation by shivsena mns and ncp against water price hike
First published on: 20-02-2018 at 15:02 IST