बारामती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसची दुचाकीला धडक बसल्याने बारामतीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र दिनकर भागवत (वय ५९, रा. गोखळी ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची नात स्वरा (वय ११) जखमी झाली. बारामती-निरा रस्त्यावर शारदानगर येथे शनिवारी सकाळी पावणेसात वाजता ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत आणि त्यांची नात हे दोघे दुचाकीवरून सकाळी पावणेसात वाजता माळेगाव येथून शारदानगरकडे चालले होते. एसटी बस बारामतीकडून निरेकडे निघाली होती. भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये भागवत यांचा जागीच मृत्यू झाला. स्वरा हिला उपचारासाठी बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वरा सायकलपटू असून, ती सहावीत शिकते. योगेशकुमार राजेंद्र भागवत यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सादिक सय्यद तपास करत आहेत.