पुणे : देशभरातील जिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे चार कोटी, उच्च न्यायालयांमध्ये एक कोटीहून अधिक आणि सर्वोच्च न्यायालयात जवळपास ७२ हजार खटले प्रलंबित आहेत. न्यायदानाच्या नेहमीच्या प्रक्रियेतून हे खटले लवकर मार्गी लागणे अशक्य आहे. त्यामुळे न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच, असे नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

इंडियन लॉ सोसायटीच्या (आयएलएस) शताब्दीनिमित्त ‘फ्युचर ऑफ मेडिएशन इन इंडिया’ या विषयावर माजी सरन्यायाधीश ‘यशवंतराव चंद्रचूड स्मृती व्याख्यान’ पुष्प गुंफतांना न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड बोलत होते. ‘इंडियन लॉ सोसायटीज् सेंटर फॉर आर्बिट्रेशन अँड मिडिएशन’चे (इल्स्का) उद्घाटन चंद्रचूड यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर, उपाध्यक्ष पी. व्ही. करंदीकर, मानद सचिव प्राचार्या वैजयंती जोशी, संचालक सत्या नारायण उपस्थित होते. 

चंद्रचूड म्हणाले, कायदा व्यक्ती निरपेक्ष आहे. पण, आपला समाज विषम असल्याने त्यांच्याकडील साधनेही विषम आहेत. मालक आणि कामगार, घरमालक आणि भाडेकरू किंवा अगदी पती-पत्नी यांच्यातील एक पक्ष कमकुवत ठरू शकतो. व्यावसायिक भागीदार आणि पती-पत्नी यांच्यात विसंवाद होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. अशा वेळी मध्यस्थ गरजेचा आहे. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने कायदेशीर सल्ला केंद्र उपक्रम राबवले तरी लोक तेथे पोहोचू शकत नाहीत. उपेक्षित आणि वंचितांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने न्यायाच्या प्रक्रियेत जनहित याचिका आणि लोकअदालत यांना म्हणूनच आगळे महत्त्व आहे.

सामाजिक प्रक्रियेतूनही प्रश्न मार्गी लागू शकतात. त्यासाठी कायद्याशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांबरोबर कायदा जाणणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सुबुद्ध नागरिकांनी मध्यस्थाची भूमिका वठवावी.  न्यायालयीन मध्यस्थाची भूमिका वठवताना आपल्याकडून घटनाबाह्य वर्तन घडणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे चंद्रचूड यांनी सांगितले.

यशवंतराव हे कायम मध्यस्थ..

 जस्टीस चंद्रचूड म्हणजे माझे वडील माझे वडील माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांनी कायम मध्यस्थ म्हणून काम केले. मी मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असताना एकाने दूरध्वनी करून ‘जस्टिस चंद्रचूड का?’ असे विचारले. वडिलांशी बोलायचे असेल असे वाटल्याने मी त्यांचा क्रमांक दिला होता. पण, त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. हा किस्सा सांगून न्या. धनंजय चंद्रचूड यांनी ‘जस्टिस चंद्रचूड म्हणजे माझे वडील अशीच ओळख माझ्या मनात अजूनही आहे’, अशी आठवण सांगितली.

गेल्या काही वर्षांत वकिली क्षेत्राचे रूपांतर व्यवसायाकडून व्यापाराकडे झाले आहे. व्यावसायिक नितिमत्ता जपताना न्यायदानाच्या क्षेत्रातील वकील, न्यायाधीश, न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ यांनी सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेत कायदा सांगितला पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– न्या. धनंजय चंद्रचूड