पुणे : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची पाहणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी केली. त्यावेळी तेथील अस्वच्छता पाहून त्यांचा पारा चढला. त्यांनी थेट विमानतळ अधिकाऱ्यांना फैलावर घेत तेथील धूळ बोट लावून दाखविली. स्वच्छ पाहिजे मला, अशी तंबी देत त्यांनी अधिकाऱ्यांना स्वच्छता करण्याचे निर्देश दिले.

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर जोतिरादित्या शिंदे यांनी नवीन टर्मिनलची पाहणी केली. त्यांनी टर्मिनलच्या कामाची कसून तपासणी केली. शिंदे हे टर्मिनलमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांना बाहेरून धूळ दिसली. त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. याचबरोबर त्यांनी थेट धूळ बोटाने पुसून अधिकाऱ्यांना दाखवली. यासाठी कोण जबाबदार याची विचारणाही त्यांनी केली.

स्वच्छ पाहिजे मला, असे बजावत अधिकाऱ्यांना हे पाहा म्हणत धूळ साचलेल्या भागाकडे घेऊन गेले. तेथील धूळ बोटाने पुसत अधिकाऱ्यांच्या समोरच त्याबद्दल विचारणा केल्याने अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. तातडीने सफाई करा, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झालेले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून नवीन टर्मिनलची सहा आठवडे चाचणी घेतली जाणार आहे. नवीन टर्मिनल योग्य पद्धतीने कार्य करीत असल्याची खातरजमा केली जाणार आहे. मात्र, नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही. टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतर चाचण्या सुरू होतील. या चाचण्यांनंतर प्रत्यक्ष टर्मिनलचा वापर करण्यास परवानगी मिळेल. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे नूतनीकरण सुरू केले जाणार आहे.

हेही वाचा : “राजकारण चोरी करणाऱ्यांसाठी आहे का?”; माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा तरुणांना सवाल

विमानतळाची जुनी इमारत आणि नवीन टर्मिनल एकमेकांशी जोडली जाणार आहे. पादचारी पुलांद्वारे या दोन्ही इमारती जोडल्या जातील. पुण्याची सांस्कृतिक ओळख दाखवणारी ही नवीन इमारत आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळाची प्रवासी क्षमता जवळपास दुपटीने वाढणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे आहे नवीन टर्मिनल

पुणे विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. हे टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित आहे. त्यात प्रवाशांसाठी पाच पादचारी पूल असून, याचबरोबर ३४ चेक-इन काऊंटर असतील. तसेच, बॅगांसाठी इन-लाईन बॅगेल हँडलिंग सिस्टिम असेल. या टर्मिनलमध्ये २७ हजार चौरस फुटांमध्ये पादचारी उड्डाणपूल आणि विक्री केंद्रांसोबत प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. नवीन टर्मिनलसाठी एकूण किंमत ४७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.