पुणे : जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून येत आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य संकट घोषित केले. यानंतर मंकीपॉक्स संसर्गाचा वेग लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानेही मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

मंकीपॉक्सबाबत काही राज्यांनी मार्गदर्शक सूचना आधीच जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असूनही राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या नव्हत्या. त्यामुळे मंकीपॉक्सच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत स्थानिक यंत्रणांसमोर प्रश्न उपस्थित झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने रविवारी (ता.१८) दिले. यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने २४ तासांच्या आत तातडीने सोमवारी (ता.१९) मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपला धक्का! भाजपचा नेता बांधणार ठाकरे गटाचे शिवबंधन

मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य विभागांना दक्ष करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा सामावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षण, प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

संशयित रुग्णाची लक्षणे

  • परदेश प्रवास केलेल्या व्यक्तीच्या शरीरावर पुरळ
  • सुजलेल्या लसिका ग्रंथी
  • ताप
  • डोकेदुखी
  • अंगदुखी
  • प्रचंड थकवा
  • घसा खवखवणे आणि खोकला

आणखी वाचा-धरणे काठोकाठ, मात्र टँकरवर मदार; पश्चिम महाराष्ट्रातील दीड लाखांवर नागरिकांची अद्याप परवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळजी काय घ्यावी…

  • संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे.
    -रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुण-पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे.
  • हातांची स्वच्छता ठेवणे.
    -आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.
  • नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे.

मंकीपॉक्स या आजाराविषयी आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने क्षेत्रीय आरोग्य उपसंचालक, आरोग्य अधिकारी, महापालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत. -अमगोथू श्री रंगा नायक, आयुक्त, आरोग्य विभाग