पक्ष्यांच्या जीवनाशी समरस झालेले ज्येष्ठ पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांच्याशी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) होणाऱ्या गप्पांतून पक्षी जगताच्या रंजक माहितीचा खजिना उलगडेल. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या उपक्रमात पुरंदरे यांची मुलाखत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जंगलामध्ये आढळणारे विविध पक्षी, त्यांच्या लकबी, त्यांचे खाणे आणि त्यांचा विहार यांसह पक्षी जगताची रंजक माहिती पुरंदरे यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून मिळेल. दिवाळी आणि थंडीची चाहूल लागताच राज्यातील पाणवठय़ांवर दरवर्षी होणारे पक्ष्यांचे स्थलांतर हा सर्वाच्याच कुतूहलाचा विषय असतो. वेगवेगळ्या ठिकाणांहून हजारो किलोमीटरचे अंतर पार करून पक्षी दरवर्षी त्याच ठिकाणी कसे येतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा प्रश्नांसह पक्षीविश्वाबद्दलची अद्भुत माहिती पुरंदरे यांच्या मुलाखतीतून मिळणार आहे.

नागझिरा जंगलामध्ये वर्षभर वास्तव्य करून तेथील वन्यजीवन आणि वन्यसंपदेमध्ये कसे बदल होत जातात याचा अभ्यास पुरंदरे यांनी मांडला आहे. आदिवासींच्या सहभागातून त्यांनी तेथे वनसंवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविला आहे. गोंड आदिवासींमध्ये जागृती करून त्यांना रोजगाराची साधने पुरंदरे यांनी मिळवून दिली. वन्य प्राण्यांसाठी निसर्गस्नेही तळी ही संकल्पना राबवून उन्हाळ्यात जंगलामध्ये पाण्याची टंचाई भासू नये याची दक्षता त्यांनी घेतली. वन विभागाच्या सहभागातून तीनशेहून अधिक तळी या जंगलामध्ये तयार करण्यात आली आहेत.

पक्षी सप्ताहानिमित्ताने..वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन (५ नोव्हेंबर) आणि ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन (१२ नोव्हेंबर). या दोन्ही पक्षितज्ज्ञांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर हा ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हेच औचित्य साधून ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’मध्ये पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांच्याशी गप्पांची मैफील आयोजित करण्यात आली आहे.

सहभागासाठी :  https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_12Nov  येथे नोंदणी आवश्यक.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran purandare today in sahaj bolta bolta event abn
First published on: 12-11-2020 at 00:03 IST