पुणे : पुण्यात घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यात १२ हजार ६९३ घरांचे व्यवहार झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३९ टक्के घट झाली आहे. यंदा सणासुदीची खरेदीचा मुहूर्त सप्टेंबरमध्येच झाल्याने ऑक्टोबरमध्ये घरांचे व्यवहार कमी झाल्याचे समोर आले आहे.

नाइट फ्रँक इंडियाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये घरांचे एकूण १२ हजार ६९३ व्यवहार झाले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये २० हजार ८९४ व्यवहार झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये हे व्यवहार ३९ टक्क्यांनी घटले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घरांच्या व्यवहारातून ७५१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. यंदा ऑक्टोबरमध्ये त्यात ३० टक्के घट होऊन ५२७ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत पुण्यात घरांचे एकूण १ लाख ५९ हजार ३४४ व्यवहार झाले आहेत. त्यातून सरकारला ६ हजार ११० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले आहे.

गेल्या वर्षी नवरात्र ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होते तर दिवाळी १ नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. त्यामुळे सणासुदीची घरांची विक्री गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली होती. यंदा नवरात्र २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान होती. त्यामुळे सणासुदीची खरेदी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात झाली. यंदा दिवाळी २० ऑक्टोबरपासून असल्याने काही प्रमाणात घरांचे व्यवहार झाले. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या व्यवहारात मोठी घट नोंदविण्यात आली. यंदा सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत ७ टक्के घट झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मध्यम आकाराच्या घरांना मागणी

गेल्या महिन्यात पुण्यात झालेला घरांचा एकूण व्यवहार मध्यम आकाराच्या म्हणजेच ५०० ते ८०० चौरस फुटांच्या घरांचे प्रमाण सर्वाधिक ४६ टक्के आहे. त्याखालोखाल ५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांचे प्रमाण २३ टक्के आहे. त्यानंतर ८०० ते १ हजार चौरस फूट १३ टक्के, १ ते २ हजार चौरस फूट १४ टक्के आणि २ हजारांपेक्षा जास्त चौरसफूट ३ टक्के असे प्रमाण आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.