पुणे : कोल्हापूर येथील विशाल पिंजानी यंदाचा ‘मिस्टर गे इंडिया २०२३ चा विजेता ठरला आहे. आता तो २७ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्‍या ‘मिस्टर गे वर्ल्ड २०२३’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस्ट एलजीबीटीक्यू फाऊंडेशन आणि क्विरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने गुरुवारी ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर केरळच्या अभिषेक जयदीप याने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले.

मिस्ट एलजीबीटीक्यू फाऊंडेशनचे संस्थापक आणि ‘मिस्टर गे वर्ल्ड इंडिया २०२०’ श्याम कोन्नूर, फॅशन स्टायलिस्ट अँडी बर्वे, फॅशन कोरिओग्राफर चैतन्य गोखले, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या सोनाली दळवी, गुजरात येथील एलजीबीटीक्यू सामाजिक कार्यकर्ता प्रिन्स मानवेंद्र सिंग गोहील, अंकिता मेहरा, स्टँड अप कॉमेडीयन श्वेता मंत्री यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. तर श्रीराम श्रीधर यांनी संयोजन केले. या स्पर्धेत विविध राज्यांतून २० स्पर्धक सहभागी झाले होते. विविध फेर्‍यांमध्ये विशाल पिंजानी आणि अभिषेक जयदीप यांनी अंतिम फेरी गाठली. या दोघांनीही उत्तम सादरीकरण करत आपली सामाजिक जाणीव दाखवत, एकमेकांना चुरस दिली. तर यामध्ये विशालला ‘मिस्टर गे महाराष्ट्र’ आणि अभिषेक याला ‘मिस्टर गे केरळा’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – पुणे: एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आर. माधवन यांनी स्वीकारली

या स्पर्धेतील विजेता विशाल पिंजानी म्हणाले की, व्यवसायाने मी ग्रंथ प्रकाशक आणि पुस्तक विक्रेता आहे. मला माझ्या कुटुंबाकडून विशेषत: माझी बहीण आणि छोटी पुतणी यांच्याकडून खूप प्रोत्साहन मिळाले. मात्र समाजात लैंगिक भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जातो. लैंगिक अल्पसंख्याक म्हणजेच समलिंगी अथवा तृतीयपंथी लोकांकडे तुच्छतेने पाहिले जाते, अशी खंतदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, अनेकदा कुटुंबीय, आप्तस्वकीय, मित्रमंडळी पाठिंबा देत नाहीत. भावनिक आधाराचा अभाव, अवमानकारक वागणूक, आमच्यावरील अत्याचार, बलात्कार, खून अशा अनेक समस्या आहेत. आम्हाला सन्मान मिळावा, द्वेषभावना वाट्याला येऊ नये, यासाठी काम करत आहे. तसेच अद्यापही ७० देशांत समलैंगिकता गुन्हा समजला जातो. ही धारणा बदलण्यासाठी जगभरातील समलैंगिक लोकांशी, संस्थांशी संलग्न होऊन काम करणार असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! पुणे मेट्रोचा प्रवास आता सवलतीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२७ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्‍या ‘मिस्टर गे वर्ल्ड २०२३’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी खूप आनंदी असून मी ही स्पर्धा निश्चित जिंकेल, असा विश्वास विशाल पिंजानी यांनी व्यक्त केला.