पुणे : कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे पुण्यातील चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून सुरू झाले. मात्र, दिवसभरात साक्ष तपासणाऱ्या, उलट तपासणी घेणारे वकील अनुपस्थित राहिल्याने आयोगाचे विशेष कामकाज होऊ शकले नाही. या टप्प्यातील कामकाज शुक्रवार (१५ मार्च) पर्यंत सुरू राहणार आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई आणि पुण्यात आयोगाची सुनावणी घेण्याचे कामकाज सुरू आहे. आयोगाकडून पुण्यात पहिल्या टप्प्यात तीन ते सहा ऑक्टोबपर्यंत चारजणांच्या साक्षी तपासण्याचे कामकाज करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत कामकाज पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यात २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत कामकाज झाले आहे, तर चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून सुरू झाले आहे. जुन्या जिल्हा परिषदेत आयोगाचे कामकाज सुरू आहे.

यापूर्वी आयोगाने गेल्या वर्षी मे महिन्यात कोरेगाव-भीमा, पेरणे फाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देऊ न स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. तसेच चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी विहित मुदतीमध्ये सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

प्राप्त अर्जाची पडताळणी करून संबंधित अर्ज/प्रतिज्ञापत्रांवर सुनावणी, साक्षी तपासण्याचे काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. आयोगाचे कामकाज पूर्ण झाले नसल्याने राज्य सरकारकडून आयोगाला ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.