कोरेगाव-भीमा येथील विजय स्तंभास गतवर्षी १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षे पूर्ण होणार असल्याने दरवर्षीपेक्षा त्यावेळी तिथे येणार्‍या नागरिकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली होती. दुर्दैवाने त्याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत अनेक नागरिकांचे आयुष्य बेचिराख झाले. काही जणांना आजही तो दिवस आठवला तरी सुन्न होते. याच कोरेगाव-भीमा पासून काही अंतरावर सणसवाडी हे गाव आहे. येथे राहणार्‍या रमा अशोक आठवले यांच्या संपूर्ण कुटुंबाला या दंगलीचा फटका बसला आहे.

या घटनेबाबत रमा आठवले यांच्याशी संवाद साधला असता. त्या म्हणाल्या की, कोरेगाव-भीमा येथून काही किमी अंतरावर सणसवाडी या गावात मी मागील २० वर्षांपासून पती आणि तीन मुलांसमवेत राहत होते. माझ्या तिनही मुलांचे बालपण आणि शिक्षण तिथेच झाले. गावातील सर्व लोकांशी आम्ही मिळूनमिसळून राहत होतो. कधी कोणाशी वाद केला नाही.

पती अशोक यांचा वेल्डिंगचा व्यवसाय होता. त्यातून काही बचत करून दरवर्षी कोरेगाव-भीमा येथे येणार्‍या नागरिकांसाठी अन्नदान करीत असत. गतवर्षी देखील नेहमीप्रमाणे सकाळपासून अन्नदान करण्यास सुरुवात झाली. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास एका जमावाने आम्हा सर्वांना मारहाण केली. त्यात मी बेशुद्ध झाले. माझे पती अशोक यांना बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने घर आणि दुकान पेटवले. एवढ्या संख्येने आलेल्या लोकांना आम्ही रोखू शकलो नाही. घर जळत असताना पाहण्याशिवाय आमच्याकडे काहीच नव्हते. आज तो प्रसंग आठवले तरी सुन्न होते. आमचा नेमका गुन्हा तरी काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही आणखी काही काळ गावामध्ये थांबलो असतो. तर आमचे काही खरे नव्हते. तेथून आम्ही पिंपरी येथे काही दिवस राहिलो. त्यानंतर प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर नुकसान भरपाई मिळाली असून पुणे महानगरपालिकेच्या कसबा पेठेतील वसाहतीमध्ये काही काळापुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे काही दिवसासाठी तरी राहण्यास मिळाले आहे.

आता १ जानेवारीला पुन्हा आम्ही सर्व कुटुंबीय कोरेगाव-भीमा येथे अभिवादन करण्यास जाणार असल्याचे सांगत सणसवाडी येथे अन्नदान करण्यास स्टॉल उपलब्ध करून दिला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र कोणत्याही परिस्थिती आम्ही १ तारखेला कोरेगाव-भीमा येथे अभिवादन आणि अन्नदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.