पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या ‘अमेडिया’ कंपनीला ४२ कोटी रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यासंदर्भातील नोटीशीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपर्यंत (२४ नोव्हेंबर)‘अमेडिया’ कंपनीकडून म्हणणे सादर केले जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार संचालक असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीने महार वतनाची चाळीस एकर जागेची परस्पर खरेदी केल्याचा प्रकार पुढे आला होता. या जागा विक्री गैरव्यवहाराचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर खरेदी व्यवहार रद्द करण्यात येईल, असे अजित पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने या कंपनीला ४२ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरण्यासंदर्भात नोटीस सात नोव्हेंबर रोजी बजाविली होती. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी सोळा नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, गेल्या शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) मुदत वाढवून द्यावी, असा अर्ज अमेडिया कंपनीच्या वतीने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे करण्यात आला होता. या अर्जामध्ये चौदा दिवसांची मुदत मागण्यात आली होती. नोंदणी आणि मुद्रंक शुल्क विभागाने मात्र अमेडिया कंपनीला सात दिवसांची मुदत दिली असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ संचालक असलेल्या ‘अमेडिया’ या कंपनीने कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाची सुमारे ४० एकर जागा तीनशे कोटी रुपयांना विकत घेतली. कायद्यानुसार महार वतनाची जागा सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. तसेच, ती हस्तांतरित किंवा गहाणही ठेवता येत नाही. मात्र, ४० एकरांचा हा भूखंड पार्थ यांच्या कंपनीने घेतला असून, जमीन व्यवहाराची किंमत कमी दाखवून मुद्रांक शुल्कही बुडविण्यात आला होता. या जमिनीचे कुलमुखत्यारपत्र शीतल तेजवानी यांच्याकडे असून बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयात त्यासंदर्भातील दस्त नोंदणीही करण्यात आली होती. त्या दस्त नोंदणीवर तेजवानी यांच्यासह अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजयसिंह पाटील यांची स्वाक्षरी होती. अमेडिया कंपनीने लेटर ऑफ इंटेट (इरादापत्र) दाखवित पाच टक्के मुद्रांक शुल्क माफी मिळविली होती. उर्वरीत दोन टक्के मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना ती न भरता दस्ताची नोंदणी केल्याचे पुढे आले होते. त्यानुसार ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्यासंदर्भात अमेडिया कंपनीला नोटीस बजाविण्यात आली होती.
