पुणे : लष्कर भागातील एका नियोजित इमारतीचा स्लॅब कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
शुभंकर जधवा मंडल (वय २१, रा. पश्चिम बंगाल) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. चेन्नी मंगल मुखर्जी (वय २१, रा. कोलकाता), वरुण (वय ३५), संन्याशी बकदी (वय २९) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरातील मेहेर अपार्टमेंटच्या समोरच एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात आला आहे. स्लॅबला लाकडी फळी, सळई लावण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी मंडल, मुखर्जी, वरुण, बकदी हे चौथ्या मजल्यावर काम करत होते. स्लॅबच्या सज्जाजवळ असलेल्या सळई, तसेच फळ्यांची पाहणी करत असताना सज्जा कोसळला. चौघेजण तिसऱ्या मजल्यावर कोसळले.
या घटनेत चौघे जण गंभीर जखमी झाले. चौघांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. उपचारांपूर्वीच शुभंकर याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी दिली.‘याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे,’ असे दिघावकर यांनी नमूद केले.