नौदलामध्ये विविध शाखांमध्ये महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी उत्तम कामगिरी बजावत आहेत. मात्र, नौदलाच्या हवाई शाखेत महिला लढाऊ वैमानिक (फायटर पायलट) नाहीत. त्यामुळे महिला वैमानिकांना सामील करून घेण्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल आर. के. धोवन यांनी शनिवारी दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून समुद्री सीमांवर निगराणी ठेवण्याकरिता अत्याधुनिक प्रणाली विकसित करण्यासंदर्भात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी (डीआरडीओ) करार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
नौदलामध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव नसल्याचेही धोवन यांनी सांगितले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२९ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नौदलातील अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, हवाई वाहतूक नियंत्रण, शिक्षण, निरीक्षण अशा महत्त्वाच्या शाखांमध्ये महिला अधिकारी उत्तम प्रकारे सेवा करीत आहेत. मात्र, नौदलामध्ये असणाऱ्या हवाई शाखेमध्ये लढाऊ विमानांसाठी महिला वैमानिक नाहीत. यासंदर्भातील प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठविला असून त्यावर संरक्षण मंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
धोवन म्हणाले, नौदलामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. समुद्री सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी उच्च दर्जाची प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशातून डीआरडीओशी करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून येत्या १५ वर्षांमध्ये नौदलासाठी आधुनिक प्रणाली विकसित केली जाणार आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्रातील खासगी कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे.
नौदलाच्या हद्दीत असलेल्या समुद्रावर टेहाळणी आणि समुद्री सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अॅटोमॅटिक आयडेन्टिफिकेशन सिस्टिम (एआयएस) प्रणाली उपयोगात आणली जात असून देशामध्ये ८७ केंद्र उभारण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ४६ रडार स्टेशन आहेत. अडीचशे समुद्री नौका सीमेवर कायम गस्त घालतात. त्यामुळे देशाच्या समुद्री सीमा सुरक्षित आहेत. अधिक सुरक्षिततेचा विचार करून मच्छिमारांची नोंद करून घेण्यात येत असल्याचेही धोवन यांनी सांगितले.
इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्य़ू
नीैदलातर्फे विशाखापट्टणम येथे ४ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ‘इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्य़ू’ होणार असून यामध्ये ४७ देशांच्या नौदलाचा सहभाग असेल. विविध देशांच्या नौदलासमवेत युद्धातील कवायतींचा सराव करता येणार आहे. सहभागी देशांना त्यांच्या नौदलाचे शक्तीसामथ्र्यही दाखविता येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्य़ूचे उद्घाटन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असतील, असेही आर. के. धोवन यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2015 रोजी प्रकाशित
नौदलात महिला वैमानिकांना सामील करण्याबाबतचा प्रस्ताव
महिला वैमानिकांना सामील करून घेण्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 29-11-2015 at 01:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies pilot proposal