किरकोळ वाद तातडीने मिटावेत आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा या हेतूने आता नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन विधी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची माहिती पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना व्हावी म्हणून पोलिसांबरोबर लवकरच बैठक घेऊन त्यांना योजनेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रत्येक नागरिकाला कायद्याचा योग्य सल्ला मिळावा, नागरिकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव यांनी दिली. ते म्हणाले, की या योजनेमध्ये किरकोळ वादावादी, कौटुंबिक वाद, मारहाणीचे प्रकार अशा घटनांमध्ये तक्रारदाराचे समुपदेशन केले जाणार आहे. तक्रार नोंदविताना येणाऱ्या अडचणी आणि त्याबाबतचे कायदेशीर मार्गदर्शन नागरिकांना दिले जाणार आहे. दोन व्यक्तींमध्ये किरकोळ वादामध्ये तडजोड होणे शक्य असल्यास त्यांना पोलीस ठाण्यात नेमणूक केलेले विधी स्वयंसेवक मदत करतील. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला तक्रार दाखल करायची असेल ती प्रथम विधी सेवा प्राधिकरणाकडे दाखल करून त्यांच्यात समझोता करण्याचे प्रयत्न प्राधिकरणाकडून केले जाणार आहेत. त्यामध्ये कायदेशीर मार्गानेच तक्रारदार आणि आरोपी यांच्यात तडजोड केली जाईल. चुकीच्या प्रकारातून होणाऱ्या तडजोडीलाही यातून आळा बसेल आणि दाखलपूर्व तक्रारीचा निपटारा करणे यातून शक्य होईल.
या विधी स्वयंसेवकांच्या नेमणुकीसाठी विधी सेवा प्राधिकरणाकडून बारा शिबिरे घेण्यात आली आहेत. त्यातून प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी दोन स्वयंसेवकांची निवड व नेमणूक करण्यात आली आहे. ठराविक वेळेत हे स्वयंसेवक त्या पोलीस ठाण्याला उपस्थित राहतील. त्याच बरोबर त्यांचे नाव आणि फोन क्रमांक हे पोलीस ठाण्यात उपलब्ध असेल. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधणे शक्य होईल. याची माहिती पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना व्हावी म्हणून पोलिसांबरोबर लवकरच बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legal guidance in every police station
First published on: 10-06-2014 at 02:54 IST