पुणे : तळेगाव ढमढेरे परिसरात अनेक दिवसांपासून लोकवस्तीत दहशत माजवणाऱ्या बिबट्यास अखेर पकडण्यात यश आले आहे. पिंजऱ्याची जागा बदलताच बारा तासांच्या आत बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून तळेगाव ढमढेरे टाकळी भिमा रस्त्यानजीकच्या ढमढेरे वस्ती परिसरात हा बिबट्या वास्तव्यास होता. त्यामुळे नागरिक दहशतीखाली होते. मात्र आता त्याला पकडण्यात यश आले आहे. रविवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा – पुणे : खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; आरटीओची केवळ बघ्याची भूमिका
तळेगाव ढमढेरे परिसरातील चौधरी वस्ती, ढमढेरे वस्ती, भिमाशेत, मोहन मळा, साळूमाळी वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार नागरिकांना पाहायला मिळत होता. बिबट्याने धावत्या दुचाकीवरील लोकांवर हल्ला केला होता. अनेकांच्या शेळ्या-मेंढ्या, वासरे फस्त केलेली होती. तर त्या परिसरातील श्वान गायब झाले होते. बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाने २९ एप्रिल रोजी ढमढेरे वस्तीनजीक पिंजरा लावला होता. मात्र, वीस दिवस उलटूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. त्यामुळे नागरिकांच्या आग्रहास्तव वस्तीपासून हा पिंजरा दुसऱ्या जागी लावल्यानंतर २० मे रोजी पहिल्याच रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. बिबट्याची मादी आणि पिल्ले याच परिसरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – येरवडा कारागृहातील कैद्याकडे सापडला मोबाईल
शिरूरचे वनाधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रमोद पाटील, वनरेस्क्यू टीम सदस्य गणेश टिळेकर, वनकर्मचारी बाबासाहेब घोलप यांनी ही कार्यवाही केली, तर अमोल ढमढेरे, संतोष ढमढेरे, वैभव ढमढेरे, रामभाऊ ढमढेरे, भाऊ सोनवणे, सार्थक ढमढेरे, सार्थक ढमढेरे, योगेश सोनवणे यांनी युवकांनी पिंजरा लावण्यापासून ते स्थलांतर करेपर्यंत अथक प्रयत्न केले.