पुणे : कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) स्वीकार कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नोकरीवर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, ‘लिंक्ड इन’ने केलेल्या पाहणीत पुण्यातील दर दहापैकी नऊ नोकरदारांनी ‘एआय’ हा मानवी ज्ञानाला पर्याय ठरू शकत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. याच वेळी ८२ टक्के नोकरदारांनी ‘एआय’मुळे निर्णयप्रक्रियेला गती मिळाल्याचे म्हटले आहे.
‘लिंक्ड-इन’ या व्यावसायिक नेटवर्कने पाहणी करून पुण्यातील नोकरदारांकडून ‘एआय’बाबत मते जाणून घेतली. या पाहणीच्या अहवालानुसार, भारतातील ८३ टक्के आणि पुण्यातील ९२ टक्के नोकरदारांनी निर्णय घेताना ‘एआय’पेक्षा विश्वासार्ह संस्था आणि व्यक्तींवरील अवलंबित कायम आहे. व्यावसायिक कारकिर्दीत पुढील टप्प्यावर प्रगती करण्यासाठी एआय आवश्यक असल्याचे मत ६७ टक्के जणांनी नोंदविले आहे. ‘एआय’चा वापर तातडीने शिकण्याची अपेक्षा कंपन्यांकडून केली जात असल्याचे शहरातील ६१ टक्के नोकरदारांनी म्हटले आहे. मात्र, ५९ कर्मचारी अद्यापही ‘एआय’चा पूर्ण क्षमतेने वापर करीत नाहीत.
‘एआय’चा नोकरदारांकडून स्वीकार वाढत असल्याचेही या पाहणीतून समोर आले आहे. कर्मचाऱ्यांनी ‘एआय’चा वापर करावा, अशी अपेक्षा पुण्यातील ७६ टक्के कंपन्यांनी व्यक्त केली आहे. याच वेळी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनात एआय हा घटक ६४ टक्के वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्त्वाचा ठरविला आहे, असे पाहणीत म्हटले आहे.
निर्णयप्रक्रियेपासून दूरच
नोकरदारांकडून मजकूर आणि मसुदा तयार करणे यांसारख्या कामांसाठी ‘एआय’चा वापर वाढला आहे. मात्र, प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत ‘एआय’चा वापर फारसा सुरू झालेला नाही. नोकरदारांना एखादा निर्णय घेण्यास अडचण आल्यास सहकारी आणि वरिष्ठांशी सल्लामसलत करून त्यांना लवकरात लवकर निर्णय घेणे शक्य होत आहे. मानवी तर्काच्या आधारे घेतलेले निर्णय अधिक योग्य असल्याचे मत ८३ टक्के नोकरदारांनी व्यक्त केल्याचे या पाहणीत नमूद करण्यात आले आहे.
‘एआय’मुळे एखादा मसुदा तयार करणे, विविध पर्यायांचा जलद गतीने शोध घेणे शक्य होत आहे. मात्र, कारकिर्दीतील पुढील वाटचालीसाठी कर्मचाऱ्याचे सर्वांगीण ज्ञान, त्याचे इतरांशी असलेले संबंध या गोष्टी महत्त्वाच्या ठरत आहेत. एखाद्या तंत्रसाधनापेक्षा सहकारी व्यक्तींवर विश्वास ठेवण्याची मानसिकता अद्याप कायम आहे. – निराजिता बॅनर्जी, वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक, लिंक्ड-इन