पुणे : राज्यात काही दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने ‘महावितरण’च्या कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असा आदेश महावितरणचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नुकताच दिला. खबरदारी म्हणून २४ तास कार्यरत आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

राज्यातील सुरळीत वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी लोकेश चंद्र यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते यांना आपत्कालीन नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

‘नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, मुख्यालय व विभाग स्तरावर आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करावा आणि तो २४ तास कार्यरत ठेवावा, महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, क्षेत्रीय, वरिष्ठ अभियंत्यांनी मोठ्या किंवा गंभीर बिघाडाच्या ठिकाणी स्वत: जाऊन दुरुस्ती कामांना वेग द्यावा,’ असे निर्देश लोकेश चंद्र यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले, ‘वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने व वेळेत सुरू करण्यासाठी अभियंत्यांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात. काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा. एखाद्या ठिकाणी दुरुस्ती कामाला वेळ लागणार असेल, तर संबंधित ग्राहकांना लघुसंदेश, समाजमाध्यमे आणि प्रसिद्धिमाध्यमांद्वारे ताबडतोब कळविण्यात यावे. वादळवारा आणि जोरदार पावसाने वीजयंत्रणेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागस्तरावर विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑइल इत्यादी दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध ठेवावे.’

खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीचे मुख्यालयाकडून पर्यवेक्षण करण्यात येत आहे. शक्य असूनही वीजपुरवठा वेळेत सुरू झाला नाही, तर त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. दुरुस्तीच्या कामात टाळाटाळ केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.- लोकेश चंद्र,अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, महावितरण