scorecardresearch

‘आर्थिक पातळीवरील असमानता अस्मितांच्या संघर्षांचे कारण’

एकही विषय असा नाही, की ज्याच्या मुळाशी अर्थकारण नाही. त्यामुळे अर्थकारण न कळणे हे राष्ट्रीय पाप आहे’’, असेही कुबेर म्हणाले.

girish kuber lecture on financial journalism
आजची अर्थपत्रकारिता’ या विषयावर गिरीश कुबेर बोलताना फोटो-लोकसत्ता टीम

पुणे : आर्थिक पातळीवरील असमानता आणि असमाधान अस्मितांच्या संघर्षांला जन्म देते. तसेच संस्कृती संवर्धनासाठी अर्थकारण महत्त्वाचे ठरल्याने त्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक ठरते, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी शनिवारी व्यक्त केले.

फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश आणि पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानात ‘आजची अर्थपत्रकारिता’ या विषयावर गिरीश कुबेर बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर या वेळी व्यासपीठावर होते.

‘‘आपल्या देशात राजकारण, चित्रपट, क्रिकेट या विषयांमध्ये सगळेच तज्ज्ञ आहेत. पण, अर्थकारण हेच राजकारण आहे, ही खरी गोष्ट आहे. एकही विषय असा नाही, की ज्याच्या मुळाशी अर्थकारण नाही. त्यामुळे अर्थकारण न कळणे हे राष्ट्रीय पाप आहे’’, असेही कुबेर म्हणाले.

आर्थिक पत्रकारितेचा इतिहास सांगताना कुबेर म्हणाले, ‘‘भारतामध्ये आर्थिक पत्रकारिता करायला हवी, असा विचार पुण्यातील महादेव नामजोशी यांनी १८७७ मध्ये पहिल्यांदा मांडला. त्या काळात त्यांनी ‘किरण’ हे वृत्तपत्र सुरू केले होते. ‘भारतीयांच्या पारतंत्र्याची आर्थिक किंमत’ या विषयावर नामदार गोखले यांनी लेख लिहिला होता. महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’मधून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर भाष्य केले होते. ’’

आर्थिक पत्रकारिता आणि आर्थिक विषयातील पदवी याचा संबंध नाही. अर्थकारण हेच राजकारण आहे अशी धारणा ठेवून पत्रकारिता करणे अवघड नाही, असे सांगून कुबेर म्हणाले, की पत्रकारितेसाठी मूलभूत चौकस बुद्धी महत्त्वाची असते. त्याद्वारे कोणताही विचार अर्थशास्त्राच्या तत्त्वांशी जोडून घेता येतो. आर्थिक विपन्नावस्थेमुळे अस्मितावाद उफाळून येतात. सम्राट अशोकाच्या राज्याबरोबरच पाली भाषा संपुष्टात आली. इंग्रजांचे राज्य असेपर्यंत ऑक्स्फर्ड इंग्रजी महत्त्वाची होती. आता अमेरिकी इंग्रजी लोकप्रिय झाली. त्यामागे अर्थकारणाची भूमिका मोलाची आहे. संस्कृती मागे पडू नये असे वाटत असेल, तर अर्थकारणाकडे लक्ष द्यावे लागेल. प्रत्येक प्रश्नाकडे सामान्यांच्या आणि अर्थकारणाच्या नजरेने पाहणे गरजेचे आहे. अभाव माहितीचा नाही, तर दृष्टिकोनाचा आहे. आपला बुद्धय़ांक कमी राहावा यासाठीच आपण काम करीत आहोत का, हे पडताळून पाहिले पाहिजे. बापट यांनी मनोगत व्यक्त केले. अरुण म्हेत्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिभा चंद्रन यांनी कुबेर यांचा परिचय करून दिला. प्राची कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सरोदे यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 01:44 IST

संबंधित बातम्या