१८ मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन

विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात करिअर करावे अशी इच्छा असलेल्या अनेकांसाठी आदर्श ठरेल, अशा एका महिला शास्त्रज्ञाला भेटण्याची संधी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. अम्रिता हाजरा यांच्याशी संवाद साधण्याची ही संधी असून ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’(आयसर) या संस्थेत त्या संशोधन आणि अध्यापन करतात. संशोधनाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘लोकसत्ता’तर्फे तरुण तेजांकित पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

केसरी टूर्स प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ हा कार्यक्रम शुक्रवारी (१८ मे) रोजी सायंकाळी ५.४५ वाजता आयोजिण्यात आला आहे. या कार्यक्रमात हाजरा यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येतील. संशोधनाच्या क्षेत्रात आघाडीवर राहून काम करणाऱ्या महिलांमध्ये अम्रिता हाजरा यांचे नाव आवर्जून घेतले जाते. विज्ञान आणि संशोधनाचा वारसा त्यांना कुटुंबातून लाभला आहे. ‘मिलेट्स’ म्हणजे भरड धान्यांविषयी अम्रिता यांचे संशोधन आहे.

सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्या आहारात गहू आणि तांदूळ यांचा अंतर्भाव मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्याचाच परिणाम म्हणून ज्वारीसारख्या भरड धान्यांचे आहारातील सेवन अवघ्या ४० ग्रॅमवर आले आहे. हे वर्ष सरकारनेही ‘राष्ट्रीय मिलेट्स वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. त्या दृष्टीने अम्रिता यांचे भरड धान्यांवरील संशोधन महत्त्वाचे ठरते. आहारातील भरड धान्यांचे महत्त्व, त्यापासून बनवता येणारे पदार्थ, त्यांचे फायदे अशा अनेक विषयांवर अम्रिता यांचे मार्गदर्शन या ‘व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने उपस्थितांना मिळणार आहे. त्याचबरोबर संशोधन क्षेत्रातील करिअर, या क्षेत्रात महिलांना असलेल्या संधी आणि आव्हाने या विषयांवरही त्या संवाद साधणार आहेत. कार्यक्रमासाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.

‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’

  • कधी – शुक्रवार, १८ मे २०१८
  • कुठे – बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे</li>
  • केव्हा – संध्याकाळी ५.४५ वाजता