स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सुट्टयांमुळे वर्षाविहारासाठी पुणे-मुंबईतील पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी केली असून मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून दाखल झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी कोंडी झाली. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या उर्से टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शनिवार, रविवार, स्वातंत्र्यदिन तसेच पारशी नववर्षाची सुट्टी जोडून आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळा, खंडाळा परिसरात दाखल झाले आहेत. पुण्याच्या तुलनेत वर्षाविहारासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक कमालीची संथ झाली असून मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. घाटक्षेत्रात वाहने बंद पडल्याने कोंडी होत आहे. खंडाळा महामार्ग पोलिसांनी कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा बोगदा येथून मुंबईकडे जाणारी मार्गिका पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी खुली केली तरी वाहनांच्या रांगा पाच ते सहा किलोमीटंरपर्यंत लागल्या. लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी झाली.

भुशी धरण, लायन्स पॅाईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. द्रुतगती मार्गावर कोंडी झाल्याने वाहनचालक लोणावळा शहरातून जात असल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार्ला लेणी, भाजे लेणी, पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ सीताराम डुबल आणि कर्मचाऱ्यांनी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मोठ्या संख्येने मोटारचालक लोणावळा शहरात दाखल झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना चालणे देखील अवघड झाले आहे.
हुल्लडबाजांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील तीन दिवस लोणावळा शहर पर्यटकांची मोठी गर्दी होणार असल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.गड-किल्ल्यांवर जाणाऱ्या वाटा निसरड्या झाल्या आहेत. वर्षाविहारासाठी आलेल्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.