पिंपरी : लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्यादिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने नगराध्यक्षासह १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत १३ प्रभाग असून २७ नगरसेवक आहेत. १२ प्रभागातून दोन आणि एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. भाजपने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकमधून सुधीर पारिटे व शुभांगी गोसावी, प्रभाग क्रमांक पाचमधून सुभाष डेनकर व बिंदा गणात्रा, प्रभाग क्रमांक सहामधून दत्तात्रेय येवले व रेश्मा पठारे, प्रभाग क्रमांक सातमधून देविदास कडू व सुरेखा जाधव, प्रभाग क्रमांक ११ मधून रचना सिनकर आणि प्रभाग क्रमांक १२ मधून अभय पारख व विजया वाळंज यांची उमेदवारी जाहीर केली. लवकरच उर्वरित उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा पक्षाकडून केली जाईल, अशी माहिती माजी राज्यमंत्री व निवडणूक प्रभारी बाळा भेगडे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नगराध्यक्षपदाची उमेदवारी राजेंद्र सोनवणे यांना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग एकमध्ये सनी दळवी, प्रभाग दोनमध्ये मंगेश मावकर, अनिता अंभोरे, प्रभाग क्रमांक तीनमधून लक्ष्मी पाळेकर, प्रभाग चारमधून रजनीकांत यंदे, प्रभाग पाचमधून मुकेश परमार, वसुंधरा दुर्गे, प्रभाग सहामधून दीपक मालपोटे, प्रभाग ११ मधून जीवन गायकवाड, भाग्यश्री जगताप, प्रभाग १२ मधून भरत हारपुडे, अमृता ओंबळे, प्रभाग १३ धनंजय काळोखे, प्रियंका कोंडे, सोनाली मराठे यांची उमेदवारी जाहीर केली. १५ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.
‘घड्याळ’ चिन्हावर लढणार
युतीसाठी मित्र पक्षांसोबत चर्चा केली. परंतु, यश आले नाही. त्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढविली जाणार असल्याचे मावळ तालुकाध्यक्ष खांडगे यांनी स्पष्ट केले.
आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी आमदार बाळा भेगडे यांची प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची सूत्रे आमदार सुनील शेळके यांच्याकडे आहेत. त्यामुळे लोणावळ्यात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
