आकर्षक क्रमांकाची ‘नंबर प्लेट’ मिळवण्यासाठी वाहनमालकांची पिंपरीच्या आरटीओ कार्यालयाबाहेर भलीमोठी रांग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटाबंदीनंतर नोटांचा आणि चलनाचा तुटवडा सर्वत्र जाणावत आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणचे व्यवहार मंदावले आहेत. पैशांसाठी बँकांच्या आणि एटीएम केंद्रांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. पिंपरीतही मंगळवारी अशीच एक रांग लागली होती. मात्र ती रांग होती पैसे भरण्यासाठी. पिंपरी उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयामध्ये आकर्षक क्रमांकाचे पैसे भरण्यासाठी ही भली मोठी रांग लागली होती. हौशी धनिकांनी या रांगेत उभे राहून आकर्षक क्रमांकासाठी लाखो रुपये भरले. वाहनासाठी १ क्रमांक मिळावा यासाठी एका हौशी वाहन मालकाने तब्बल चार लाख रुपयांची बोलीही या वेळी लावली.

[jwplayer CdTbNsE8]

उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडध्ये आलिशान वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. त्या बरोबरच या वाहनाला मनाजोगा क्रमांक मिळावा यासाठीही खरेदीदारांचा प्रयत्न असतो. क्रमांकाच्या हौसेला मोल नाही, अशीच ही परिस्थिती असते.

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर सामान्य नागरिक बेचैन झाला आहे. या निर्णयाच्या चौदा दिवसांनंतरही पैसे काढण्यासाठी आणि जुन्या नोटा बदलण्यासाठी एटीएम केंद्रांच्या आणि बँकांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. मात्र, पिंपरी आरटीओ कार्यालयामध्ये ‘फॅन्सी नंबर’ची हौस भागवणाऱ्या तसेच प्रतिष्ठेसाठी आकर्षक क्रमांक घेणाऱ्यांच्या रांगा मंगळवारी लागल्या होत्या. आकर्षक क्रमांकाचे पैसे धनाकर्षांद्वारे डीडीद्वारे भरण्याची सक्ती असते. त्यानुसार हजारो, लाखो रुपये डीडीद्वारे भरले जात होते.

आकर्षक क्रमांक घेण्यासाठी आलेल्यांकडून पिंपरी कार्यालयात जुन्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. त्यामुळे आकर्षक क्रमांक घेणारे वाहन मालक डीडीद्वारे चलन भरत होते. येथील आरटीओ कार्यालयात सोमवारी (२१ नोव्हेंबर) एका दिवसात ४३० वाहन मालकांनी आकर्षक क्रमांकासाठी तब्बल ५७ लाख सहा हजार रुपयांचा भरणा केला. तर मंगळवारी (२२ नोव्हेंबर) दिवसभरामध्ये ३५० वाहन मालकांनी आकर्षक क्रमांकासाठी १४ लाख ७५ हजार रुपये डीडीद्वारे भरले. कार्यालयातर्फे ६९ आकर्षक क्रमांकांसाठी लिलाव करण्यात आला. त्यात १ क्रमांकासाठी चार लाख रुपयाची सर्वाधिक बोली लावण्यात आली. ८ आणि १००१ या क्रमांकासाठी ५० हजार रुपयांची बोली लावण्यात आली. तर ९, ९०९, ९००९, ९९९०, ९९००, ९३३९, ६२६२, १०१०, २५२५, १५१५, ९०, ७१७१ या क्रमांकांना वाहन मालकांची सर्वाधिक पसंती होती.

आकर्षक क्रमांकासाठी आरटीओ कार्यालयाने क्रमांकाचा लिलाव केला आहे. आकर्षक क्रमांकाचे पैसे डीडीद्वारे स्वीकारण्यात येत आहेत. कार्यालयात आतापर्यंत ८०० वाहन मालकांनी आकर्षक क्रमांकासाठी पैसे भरले आहेत. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

– अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी

[jwplayer PuSvtqP8]

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Long queue at pimpri rto office for fancy number plates
First published on: 23-11-2016 at 04:02 IST