चारचाकी गाडय़ांचे फ्रंट गार्ड, रिअर गार्ड, साईड स्टॅम्प, रुफ लगेज कॅरिअर असे भारतीय बनावटीचे सुटे भाग तयार करणाऱ्या भारतीय कंपन्या किंवा फर्म अत्यंत मोजक्या आहेत. अशा मोजक्या फर्ममध्ये भोसरीतील एम-टेक इंजिनिअर्सचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुण्यातील एका बडय़ा कंपनीला उत्पादने पुरविणाऱ्या मुख्य वितरकाचे सह वितरक म्हणून काम सुरू केलेल्या एम-टेकचे केवळ त्यांची उत्पादने विकणारे देशभरात तब्बल चाळीस वितरक आहेत. चारचाकीच्या सुटय़ा भागांच्या बाजारपेठेवर वर्चस्व असणाऱ्या चीनसारख्या देशानेही एम-टेकच्या उत्पादनांची दखल घेतली आहे.
महाविद्यालयापासून मैत्री असलेल्या मनीष कोल्हटकर आणि मंदार किराणे या दोन मध्यमवर्गीय मित्रांनी १९९५ मध्ये एम-टेक इंजिनिअर्स पार्टनरशिप फर्म स्थापन केली. मनीष व मंदार यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनीष यांनी भारत फोर्ज आणि टाटा मोटर्स अशा दोन कंपन्यांमध्ये पाच वर्षे नोकरी केली. मंदार हे पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. वाहन क्षेत्राची आवड असल्याने आणि त्यामुळे त्या क्षेत्राशी निगडितच काहीतरी करायचे असे मनाशी निश्चित केले असल्याने मंदार यांनी भारतात परतल्यानंतर एम-टेकच्या कामाला सुरुवात झाली. व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर फर्मचे स्वत:चे असे कोणतेच उत्पादन नव्हते. टाटा मोटर्स कंपनीच्या मुख्य विक्रेत्याला लागणारी उत्पादने पुरविण्यापासून म्हणजेच सह उत्पादक म्हणून एम-टेकची सुरुवात झाली. पहिली पाच वर्षे अशा प्रकारची कामे केल्यानंतर २००१ पासून एम-टेकने स्वत:ची उत्पादने तयार करून विकण्यास सुरुवात केली. उत्पादनांचे ब्रॅण्ड नाव देखील एम-टेक असेच ठेवण्यात आले. चारचाकींचे सुटे भाग हे फर्मचे मुख्य उत्पादन आहे. त्यामध्ये फ्रंट गार्ड, रिअर गार्ड, साईड स्टॅम्प, रुफ लगेज कॅरिअर यांचा समावेश आहे. शहरांतर्गत फिरताना वाहनांच्या अपघातांपासून ही उत्पादने बचाव करतात. स्टेनलेस स्टील, प्लॅस्टिक, रबर, पॉलियूरिथिन फोम अशा अनेक धातूंचे मिश्रण करून ही चार उत्पादने बनविली जातात.




व्यवसायाला सुरुवात केल्याच्या काळात चारचाकी गाडय़ांना फ्रंट गार्ड, कॅरिअर असे घटक गाडय़ांबरोबरच विक्रीसाठी दाखल होत असत. कालांतराने गाडय़ा तयार करणाऱ्या कंपन्यांकडून विक्रेत्यांकडे येताना फ्रंट गार्ड, कॅरिअर हे साहित्य येणे बंद झाले. त्यामुळे पंडित ऑटोमोबाईलकडून एम-टेकला ही उत्पादने बनवून देऊ शकता का, अशी विचारणा झाली. मागणी आली आहेच तर करून पाहू, अशाप्रकारे फर्मने स्वत:ची उत्पादने करण्यास सुरुवात केली. चारचाकींचे पुढचे गार्ड स्टेनलेस स्टीलचे असते. त्यामुळे एखाद्याला गाडीची धडक बसल्यास गंभीर इजा पोहोचू शकते. त्यामुळे हे गार्ड प्लास्टिकचे बनविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. व्यवसाय सुरू केला तेव्हा चारचाकींमध्ये मारुती ओम्नी, मारुती ८००, फियाट अशा मोजक्याच गाडय़ा होत्या. कालांतराने चारचाकी गाडय़ांमध्ये वाढ होत गेली आणि उत्पादनांची मागणी वाढली.
वार्षिक उलाढाल काही लाखांमध्ये असणाऱ्या एम-टेकची उलाढाल आता कैक कोटींच्या घरात पोहोचली आहे. वितरकांच्या माध्यमातूनच उत्पादनांची विक्री करणाऱ्या एम-टेकचे भारतभरामध्ये चाळीस वितरक आहेत. टाटा मोटर्स आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या दोन कंपन्यांना उत्पादन विकले जाते. भोसरीमधील एमआयडीसीमध्ये एम-टेकचे तीन आणि भोसरीपासून आठ किलोमीटर अंतरावर मोई येथे एक असे चार उत्पादन प्रकल्प आहेत. याबरोबरच केवळ फर्मसाठी उत्पादन करणाऱ्या वितरकांचे उत्पादन प्रकल्प आहेत. सर्व उत्पादन प्रकल्पांमध्ये मिळून साडेतीनशे कामगार काम करतात.
एम-टेककडून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांची खूप मोठी बाजारपेठ चीनमध्ये आहे. परिणामी चीनमधून बराचसा माल भारतात येतो आणि विकला जातो. मध्यंतरी मनीष आणि मंदार हे दोघे या क्षेत्रातील चीनच्या बाजारपेठेचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. एके ठिकाणी एम-टेकच्या उत्पादनांसारख्याच वस्तू दिसल्याने सहज विचारणा केल्यानंतर ‘आम्हाला भारतामधून हे उत्पादन बनविण्याची मोठी मागणी मिळाली आहे. परंतु, हे उत्पादन आमच्या देशात तयारच होत नसल्याने आम्ही काही नमुने भारतातूनच आणले आहेत’, अशी माहिती त्यांना मिळाली. हा आश्चर्याचा धक्का मनीष व मंदारसाठी होता. कारण चीनमध्ये बनविली जाणारी उत्पादने भारतासह, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया या देशात विक्रीसाठी येतात. आपल्या उत्पादनांची नक्कल केली म्हणून चीनसारख्या देशाशी लढण्यात खूप शक्ती खर्च होईल. म्हणून त्याबाबत काहीच आक्षेप घेतला नाही. परंतु, या घटनेने एम-टेकची ताकद आणि बाजारपेठेची मागणी अशा दोन्ही गोष्टी लक्षात आल्या.
‘१९९५ ते २००० या पाच वर्षांत आम्ही व्यवसाय कसा करावा. यापेक्षा कसा करू नये हेच शिकलो. २००१ मध्ये फ्रंट कॅरिअर, रिअर गार्ड, साईड स्टॅम्प, रुफ लगेज कॅरिअर यांचा एम-टेकने ब्रॅण्ड तयार केला. तोपर्यंत ही उत्पादने घेणाऱ्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतातच खूप कमी कंपन्या, फर्म होत्या. तसेच ही उत्पादने तयार करणारे मनुष्यबळही उपलब्ध नव्हते. उपलब्धता नसल्याने साहजिकच स्पर्धा नव्हती. लोक चारचाकी गाडय़ा घेतात, परंतु शहरातल्या शहरात किंवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या गाडय़ांच्या सुरक्षिततेबाबत नेमकी कशी काळजी घ्यायची, याबाबत अद्यापही जागरूकता आलेली नाही’, असे मनीष सांगतात.
चारचाकींना लागणाऱ्या सुटय़ा भागांची आशियामध्ये मोठी बाजारपेठ आहे. परंतु, भारतात तुलनेने अत्यंत कमी उत्पादन घेतले जाते. त्यामुळे आगामी काळात एका चारचाकी गाडीची आंतरराष्ट्रीय पातळीवर गणना व्हावी यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी भारतीय बनावटीची उत्पादने मोठय़ा प्रमाणावर घेण्याचा प्रयत्न एम-टेककडून करण्यात येणार आहे. कारण चीनमधून आलेल्या मालाची अनेकदा भारतात नक्कल करून तशीच उत्पादने बनविण्यात येतात.
‘माझ्याबरोबर अनेकांनी हाच आणि अशाच प्रकारचा व्यवसाय नेटाने केला. त्यांनी आज खूप मोठा पल्ला गाठलेला आहे आणि याच्याबरोबर उलट एक-दोन अपयशानंतर सतत मार्ग बदलणारे व्यवसायातून बाहेर पडलेले पाहिले आहेत. त्यामुळे कोणताही व्यवसाय करताना सातत्य हवे. एम-टेक फर्म पूर्णपणे भारतीय बनावटीची उत्पादने तयार करते. प्रत्येक उत्पादन भोसरीमधील प्रकल्पामध्येच तयार होते. पुणेकरांबरोबरच प्रत्येक भारतीयानेही आपण भारतीय बनावटीचीच उत्पादने वापरू असा निर्धार केला तर अशा कंपन्या, फर्म यांचा मोठय़ा प्रमाणावर विस्तार होऊ शकेल’, असेही मनीष आवर्जून सांगतात.
प्रथमेश गोडबोले prathamesh.godbole@expressindia.com