प्लास्टिक, रबर आणि बांधकामावरील टाकाऊ पदार्थ अशा पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या गोष्टी एकत्र करून पेव्हिंग ब्लॉक, रस्त्याच्या कडेला अंतराची माहिती देण्यासाठी लावले जाणारे दगड, सीमाभिंतीसाठी लागणाऱ्या विटा, गटारांची झाकणे यांची निर्मिती करण्याचे प्राथमिक स्तरावरील काम फुगेवाडी येथील बावीस वर्षीय स्थापत्य अभियंत्याने सुरू केले आहे. त्यासाठी त्याने एका कंपनीचीही स्थापना केली असून या उत्पादनांचे स्वामित्व हक्क (पेंटट) मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. या युवकाने निर्मिती केलेल्या साहित्याचे दर हे सिमेंटच्या साहित्यापेक्षा कमी आहेत. या उत्पादनांचा पुनर्वापरही करण्याची सोय, हे या उत्पादनांचे वैशिष्टय़ आहे.
फुगेवाडी येथील वरुण साळुंखे या युवकाने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये स्थापत्य शाखेची अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे. अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत असतानाच प्लास्टिक, रबर यापासून होणारी हानी थांबविण्याच्या उद्देशातून या साहित्यापासून विविध वस्तू किंवा उत्पादने तयार करता येतील, अशी नावीन्यपूर्ण कल्पना त्याला सुचली. पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याने या कल्पनेवर काम सुरू केले. ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्याने विविध प्रयोग करून पाहिले. त्याआधारे अशा प्रकारच्या वस्तूंचे उत्पादनही सुरु झाले आहे. वरुणने टाकाऊ प्लॅस्टिक, रबर आणि बांधकामावरील निकामी झालेले साहित्य एकत्र करुन त्यापासून पेव्हिंग ब्लॉक, मैलाचे दगड, गटारांची झाकणे, सीमाभिंतीसाठी लागणाऱ्या विटा, गतिरोधकासाठी लागणाऱ्या विटा अशा साहित्याची निर्मिती केली आहे.
टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या विटा आणि दगड वजनाने हलके असून त्यांचा पुनर्वापरही केला जाऊ शकतो. सिमेंटपासून तयार केलेल्या विटांच्या उत्पादनाचा खर्च जास्त असल्याने त्या महाग आहेत. त्यांचा वापर करताना जे काम करावे लागते त्यासाठीही जास्त वेळ लागतो. वरुणने विकसित केलेल्या पद्धतीमध्ये हव्या त्या आकाराचे आणि रंगाचे पेव्हिंग ब्लॉक बनवता येऊ शकतात. वरुण याने उत्पादन तयार करण्यासाठी ग्रुवला कन्स्ट्रक्शन अॅंड इन्फ्रास्ट्रक्चर या नावाने कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीला ‘स्टार्ट अप इंडिया’ची मान्यता मिळाली आहे. स्वामित्व हक्क मिळाल्यानंतर वरुण रीतसर उत्पादन घेण्यास सुरुवात करणार आहे. हे उत्पादन कौशल्य विकसित नसणाऱ्या कामगारांकडूनही करुन घेता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे एकदा उत्पादन सुरु झाल्यानंतर अकुशल कामगारांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळू शकतो, असा दावाही वरुण याने केला आहे.