पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बाबत माधवी खंडाळकर यांनी सोशल मिडीयावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यावरून दोन दिवसापूर्वी दुपारच्या सुमारास रुपाली पाटील ठोंबरे यांची बहीण प्रिया सुर्यवंशी, वैशाली पाटील,पूनम गुंजाळ आणि अमित सुर्यवंशी या चौघांनी माधवी खंडाळकर या महिलेला मारहाण केल्याची घटना घडली.त्या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकर यांनी माझ्या बहिणीसह चार जणां विरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला असून या घटनेमागे रुपाली चाकणकर असल्याचा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी काल केला होता.
रुपाली पाटील ठोंबरे यांच्या आरोपानंतर या प्रकरणातील फिर्यादी महिला माधवी खंडाळाकर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या,मी आणि रुपाली पाटील ठोंबरे आमच्या दोघींमध्ये काही वर्षांपूर्वी मैत्री होती.पण रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडून सातत्याने त्रास देण्याच्या घटना घडल्या.त्यामुळे मी,रुपाली पाटील ठोंबरे यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद ठेवला नाही.पण तरी देखील रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडून विविध मार्गाने मला त्रास देण्याचे काम सुरूच होते. तर दुसर्या बाजूला कोणत्याही घटनेवर प्रसार माध्यमांसमोर रुपाली पाटील या सातत्याने चुकीच्या पद्धतीने भूमिका मांडत होत्या. त्यामुळेच मी तीन दिवसांपूर्वी रुपाली पाटील ठोंबरे यांच्याबाबत एक पोस्ट केली होती.त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांची बहीण,मावशी,मामा आणि अन्य एक व्यक्ती माझ्या घरात येऊन मला मारहाण केली.त्यामध्ये मला दुखापत झाल्याची घटना घडली.
त्यानंतर मला मारहाण करणार्या चौघांविरोधात खडक पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास गेले.पण त्यावेळी माझ्यावर दबाव टाकून तक्रार मागे घेण्यास सांगितली.त्याच रात्री पुन्हा रुपाली पाटील ठोंबरे यांच्या कुटुंबातील सदस्य माझ्या घरी येऊन माझ्यावर पुन्हा दबाव टाकून मी गैरसमाजातून सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला असल्याच म्हणण्यास सांगितले. त्यानुसार मी तो व्हिडीओ पोस्ट केला.या सर्व एकामागून एक घटना घडत गेल्या.त्यानंतर मी काल पुन्हा खडक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मला मारहाण करणार्या चौघां विरोधात तक्रार दिली.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरून तुम्ही रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बहिणीसह अन्य चौघांविरोधात तक्रार दिल्याचा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.त्या प्रश्नावर माधवी खंडाळकर म्हणाल्या,मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 6 वर्षांपूर्वी होते.त्यावेळीच मी रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्कात होते. त्यानंतर आजअखेर मी रुपाली चाकणकर यांच्या संपर्कात नाही.मला त्रास दिल्याने मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा कोणताही संबध नाही.मला झालेल्या मारहाण प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून मला न्याय द्यावा, तसेच मी येत्या कालावधीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
