पुणे : बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशातील तरुणाला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

करवेंद्रसिंग राघवेंद्रसिंग चव्हाण (वय २६, सध्या रा. बेल्हेकर वस्ती, मांजरी, मूळ रा. महू, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथक केसनंद-थेऊर रस्त्यावर गस्त घालत होते. त्या वेळी एक जण पिस्तुल घेऊन तेथे येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चव्हाणला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे एक पिस्तुल आणि काडतुस सापडले. चौकशीत त्याने पिस्तुल विक्रीसाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिली.

तपासात त्याच्याकडून आणखी दोन पिस्तुले जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडेकर, रमेश मेमाणे आदींनी ही कारवाई केली.