पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी, तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची, लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक, तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी तीनपट शुल्कासह १५ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष १६ मे रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी चार वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल, अशी माहिती आरटीओने दिली.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड: पत्नीला शिवीगाळ केल्याने मित्राची हत्या; गुंडा विरोधी पथकाने आरोपीला ठोकल्या बेड्या

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास १६ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी १७ मे रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी चार वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल, असे आरटीओने स्पष्ट केले आहे.

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचा पुणे येथील असावा, असे आरटीओने नमूद केले आहे.

हेही वाचा – पुणे : जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळली; उत्तर प्रदेशातील भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील वाहनधारकांनीच अर्ज करावेत

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर न केल्यास राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल आणि शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज, चुकीच्या रकमेचा डीडी जोडलेले तसेच अचूक मोबाईल क्रमांक न लिहिलेले अर्ज बाद ठरविण्यात येणार असल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.