सतराव्या-अठराव्या शतकात ब्रिटनमध्ये प्राणी पालनाच्या हौसेला महत्त्व आले. तत्कालीन मध्यमवर्गीयांच्या हातात पैसे खुळखुळू लागल्यामुळे घरात प्राणी बाळगण्याचा शौक परवडणारा होता. ब्रिटनमधून प्राणीपालकांचा वर्ग अमेरिकेत स्थलांतर झाला, तेव्हा तेथे प्राणीपालनाची, त्यांच्या काळजीची आणि आजारपणातल्या शुश्रूषेची माहिती इतर प्राणीधारकांना करून देण्यासाठी माहितीपत्रांची गरज निर्माण झाली. त्यातून अनियतकालिकांच्या स्वरूपात काही हौशी प्राणीप्रेमींनी छापील मजकूर आपापल्या वर्तुळात वाटायला सुरूवात  केली. १९१६ साली निघालेलय़ा ‘डॉग वर्ल्ड’ याची आरंभीच्या मासिक शिलेदारांमध्ये गणना होते. २०१२पर्यंत हे मासिक अव्याहत सुरू होते. इंटरनेटच्या आक्रमणकाळात पेटउद्योगाचा आणि त्याला पूरक व्यवसायांचा उदय झाला आणि पेट मॅगझिन्सच्या अनंत आवृत्त्या देशोदेशी तयार झाल्या. आज जगातील सर्वच प्रगत आणि प्रगतिशील देशांत प्राणीपालकांसाठी खंडीभर मासिके उपलब्ध आहेत.

डॉगवर्ल्डचे कार्य

पहिल्या महायुद्ध काळात एकूणच मासिकांची निर्मिती मोठी होती. युद्धावर गेलेल्या सैनिकांसाठी आणि त्यामुळे एकटय़ा पडलेल्या त्यांच्या कुटुंबीयांसाठी मासिके निघत. श्वानप्रेमी आणि त्यांची पैदास करणाऱ्या ब्रिडर्सना उपयुक्त ठरावे यासाठी या मासिकाची निर्मिती करण्यात आली होती. जानेवारी १९१६ मध्ये त्याचा पहिला अंक निघाला, सप्टेंबर २०१२ पर्यंत नियमित अंक प्रकाशित होत होते. या शतकभरात अमेरिकेत ‘पेट गॅझेट्स’ आणि ‘खाद्य’, औषधे आणि वेगवेगळ्या सेवा देण्याचा उद्योग वधारला. डॉगवर्ल्डने सुरूवातीपासून कुत्र्यांविषयीच्या मूलभूत माहितीपासून अंकाचे वेगळेपण टिकवण्याचा प्रयत्न केला. प्राण्यांच्या संगोपनाच्या पद्धती अनुभवी व्यक्तींच्या मुलाखती, लेख, नवे ट्रेंड्स, संशोधने यांपासून ते वेगवेगळ्या सेवा यांचा आढावा या अंकातून घेण्यात येत असे. ‘डॉग वर्ल्ड’चे प्रकाशन बंद करण्यात आले. मात्र या अंकाची पालकसंस्था ‘बो-टाय’ यांनी ‘निश’ मॅगझिनचा म्हणजेच पशू पालनाशी संबंधित प्रत्येक मुद्दय़ासाठी स्वतंत्र अंक काढण्याचा ट्रेंड रुजवला. ‘डॉग फॅन्सी’, ‘कॅट फॅन्सी’, ‘बर्ड टॉक’, ‘हॉर्स इलस्ट्रेटेड’, ‘अ‍ॅक्व्ॉरिअम फिश इंटरनॅशनल’, ‘डॉग्स इन रिव्ह्य़ू’ असे स्वतंत्र अंक काढण्यात येतात.

व्यवसाय प्रसाराचे माध्यम

श्वान, मांजर आणि पक्षी आणि मत्स्यपालन या विषयांना वाहिलेली स्वतंत्र मासिके अमेरिकेपासून संपूर्ण दक्षिण आशियाई खंडातील प्रत्येक देशात निघत आहेत. हाँगकाँग-चीन- जपान आणि दक्षिण कोरिया त्यात आघाडीवर आहेत. आज अमेरिकेतील ९० टक्क्य़ांहून अधिक पेटधारक आपल्या घरातील प्राण्याला सदस्य मानतात आणि वर्षांला ६० अब्ज डॉलर निव्वळ त्यांच्या गॅझेट्सखरेदीवर खर्च करतात असे काही अहवालांतून समोर आले आहे. डॉक्टर-औषधे आणि इतर खर्च करताना ही सर्व प्राणीपालक मंडळी या मासिकांचे रीतसर सदस्य बनतात. या अंकाच्या वाचकांचे इंटरनेटवर फोरम्स, क्लब्स आणि ब्लॉग्ज सुरू असतात. या अंकांमधून निव्वळ घरातल्या प्राण्यांच्या संगोपनाविषयी माहिती दिली जात नाही, तर त्यासाठी बाजारात तयार झालेल्या गॅझेट्सची माहिती मिळते. अस्ताव्यस्त पसरत जाणाऱ्या ‘पेट इंडस्ट्री’ला जाहिरातींच्या माध्यमातून या प्रकाशनांनी हात दिला. कुत्र्या-मांजरांसाठी असलेली विविध उपकरणे, त्यांच्या पोषणासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणकांनुसार तयार केलेले खाद्य आणि औषधे यांच्या जाहिराती आणि त्यांच्याविषयीचे लेख यांचा या अंकांमध्ये समावेश करण्यात येतो. अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया येथील काही मासिकांचे वितरण हे ३ ते ४ लाख प्रती असल्याचे दावेही करण्यात आले आहेत.

प्राणीपालक वाचकांसाठी प्रकाशने आहेत तशीच पशूवैद्यांसाठीची स्वतंत्र प्रकाशने आहेत. त्यातून उपचार पद्धती, औषधे, नवे शोध यांचा आढावा घेण्यात येतो. त्याचबरोबर ‘ब्रीडर्स’, ‘प्रशिक्षक’, ग्रुमर्स’ अशा प्रत्येक व्यवसायासाठीही स्वतंत्र अंक प्रकाशित केले जातात. एकूण पशुपालनाचा आढावा घेणाऱ्या अंकाबरोबर कुत्री, मांजरे, छोटे प्राणी, मासे, पक्षी असे प्रत्येकाला स्वतंत्रपणे वाहिलेलीही मासिके अथवा द्विमासिके आहेत. ‘ बार्क’, ‘मॉडर्न डॉग’, ‘के- नाईन मॅगझिन’, ‘डॉग्स अँड पप्स’ ‘डॉग्स लाईफ’,‘फिडो फ्रेंडली’, ‘क्रेझी फॉर किटीज,’ अशी अनेक उदाहरणे देता येतील. टॉय डॉग किंवा कुत्र्यांच्या छोटय़ा प्रजातींसाठी ‘न्यू चिवावा कनेक्शन’ प्रसिद्ध होते. कुत्र्यांच्या स्पर्धा, खेळ यांना वाहिलेले ‘मशिंग’ हे मासिक प्रकाशित होते व ते खूपच लोकप्रियही झाले आहे.