पुणे : Maharashtra Board SSC 10th Verification and Revaluation Process राज्य मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१३ मे) ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुनर्मूल्यांकन, गुणपडताळणी, पुरवणी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नोंदणीतीही माहिती राज्य मंडळाने दिली आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन निकालानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी आवश्यक सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी-छायाप्रतीसाठी १४ ते २८ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच शुल्कही ऑनलाइन भरता येईल.
फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे, शुल्क भरणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु. मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुरवणी परीक्षा अर्जांबाबत
राज्य मंडळातर्फे जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.