पुणे : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे राज्याला ‘पीएम ई-विद्या’च्या पाच शैक्षणिक दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहिनीवर पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण केले जाते. तसेच, हे कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने यू ट्युब वाहिनीवरही उपलब्ध करण्यात आले आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी याबाबत राज्यातील विभागीय उपसंचालक, विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, महापालिका, नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी, शिक्षण निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत.
शिक्षण मंत्रालयाने शैक्षणिक दूरचित्रवाणी वाहिन्यांचे पुनर्वाटप केले आहे. त्यानुसार पीएम ई विद्या ११३ या दूरचित्रवाणी वाहिनीवर, एससीईआरटीएम सी ११३ या यू ट्युब वाहिनीवर पहिली आणि सहावी, पीएम ई-विद्या ११४ या दूरचित्रवाणी वाहिनीवर, एससीईआरटीएम सी ११४ या यू ट्युब वाहिनीवर दुसरी आणि सातवी, पीएम ई-विद्या ११५ या दूरचित्रवाणी वाहिनीवर, एससीईआरटीएम सी ११५ या यू ट्युब वाहिनीवर तिसरी आणि आठवी, पीएम ई-विद्या ११६ या दूरचित्रवाणी वाहिनीवर, एससीईआरटीएम सी ११६ या यू ट्युब वाहिनीवर चौथी आणि नववी, तर पीएम ई-विद्या ११७ या दूरचित्रवाणी वाहिनीवर, एससीईआरटीए सी ११७ या यू ट्युब वाहिनीवर पाचवी आणि दहावीचे शैक्षणिक कार्यक्रम दाखवण्यात येतात.
दूरचित्रवाणी वाहिनीवर दोन इयत्तांसाठी मिळून दररोज सहा तास, तसेच २४ तासांच्या कालावधीत तीन वेळा पुन:प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रातील शाळांना याचा उपयोग होईल. विद्यार्थी घरी असताना सकाळी किंवा सायंकाळी कार्यक्रम पाहू शकतात. या कार्यक्रमात मुख्य विषयांचा समावेश आहे.
आवश्यकतेनुसार दैनंदिन अध्ययन, अध्यापनातही त्याचा उपयोग करता येऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शैक्षणिक कार्यक्रम एससीईआरटीच्या आयटी विभागामार्फत राज्यातील ३१ जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर अशा एकूण ३२ कार्यालयांच्या समन्वयाने, तज्ज्ञ शिक्षकांच्या साहाय्याने स्टार्स उपक्रमांतर्गत तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या वाहिन्यांबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, प्रक्षेपण वेळापत्रक पालकांच्या निदर्शनास आणून द्यावे, प्रक्षेपणाचे मासिक वेळापत्रक, वाहिन्यांचा थेट दुवा http://www.maa.ac.in/ संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.