महाराष्ट्रात सध्या वीजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असून याचाच भाग म्हणून छत्तीसगडमधील खाण घेण्याची तयारी सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. तसंच परदेशातून देखील कोळसा आयात करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अजित पवारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसह नितीन राऊत यांनी लोडशेडिंगच्या परिस्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती दिली. पुढे ते म्हणाले की, “सुरळीत वीज पुरवठा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशपातळीवर कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्र सरकार छत्तीसगडमधील कोळशाची खाण घेण्याचा विचार करत आहे. नितीन राऊत त्यासाठी प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील सरकार काँग्रेसच्या विचारांचं असून सोनिया गांधींनी त्यासंबंधी सरकारला सांगितलं आहे. त्याचबरोबर परदेशातून देखील कोळसा आयात करण्यात येणार आहे. त्यासंबंधी निर्णय घेतला आहे”.

विश्लेषण: महाराष्ट्रातील काही भागांना लोडशेडिंगचा सामना का करावा लागेल?

दरम्यान केंद्राकडून राज्याला कोळसा पुरवठा न करत सुडाचं राजकारण केलं जात आहे का? असं विचारण्यात आलं असता अजित पवारांनी फक्त महाराष्ट्र नाही देशातील अनेक राज्यांना केंद्र सरकार पुरवठा करु शकत नाही असं सांगत दावा फेटाळला.

अजित पवार संतापले

प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर विचारलं असता ते संतापले आणि म्हणाले की, “माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजेत”.

“पोलीस अधिकाऱ्यांच्या स्थगितीबद्दल माहिती नाही”

“मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यासंबंधी निर्णय घेतला होता. तो त्यांचा अधिकार आहे. कमिटी शिफारस करते त्यानुसार निर्णय होतो. काहींना स्थगिती दिली असं आज मी वाचलं आहे. मुंबईत जाऊन जोपर्यंत मी याबद्दल माहिती घेत नाही तोवर काही सांगू शकत नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं.

अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वक्तव्यासंबंधी विचारलं असता संतापले अजित पवार; म्हणाले “तारतम्य ठेवून…”

“२२१ कोटींचा नागरी सहकारी बँकांचा घोटाळा समोर आणण्याचे काम मीडियाने केले. पण साडे तीन हजारापेक्षा जास्त ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांचा ६७ हजार कोटींचा घोटाळा याच काळात झाला. ते प्रमाण एकूण घोटाळ्याच्या ९० टक्के आहे आणि नागरी सहकारी बँकांचं प्रणाम पाव टक्का आहे. पण मी कुणाचं समर्थन करत नाही. कोणत्याही प्रकारच्या बँका असल्या तरी त्यांनी जनतेचा पैसा सुरक्षितच ठेवला पाहिजे. कर्ज बुडवणार नाही अशा नेत्यांनाच ते दिलं पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.

“मी खासगी रुग्णालयात गेलो तेव्हा मीच बिल भरलं होतं. ज्या मंत्र्याने घेतलं त्याला विचार बाळा. तू का असं केलं. मंत्री असताना सरकारचा पैसा खर्च करण्याऐवजी स्वत:चा पैसा खर्च करायला हवा होता,” असं स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलं.