पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा (टेट) निकाल रखडला असल्याने राज्यभरातील उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. या संदर्भात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालाबाबतची कार्यवाही सुरू असून, व्यावसायिक परीक्षांच्या निकालाबाबतची माहिती एकत्रित करण्यास वेळ लागत असल्याचे स्पष्टीकरण परीक्षा परिषदेने सोमवारी दिले.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेने ‘आयबीपीएस’मार्फत २७ ते ३० मे, २ ते ६ जून या कालावधीत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आयोजित केली. राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर दररोज तीन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांपैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. परीक्षा होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे.
परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता, त्याच वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे संबंधित व्यावसायिक परीक्षा (बी. एड., डी.एल.एड.) उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. संबंधित व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५चा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त आणि एकत्रित होण्यास वेळ लागत आहे.’
‘डी.एल.एड.चा निकाल ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने ‘शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२५’च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे. हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल,’ असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
‘समाजमाध्यमांतील बातम्या, अफवांवर विश्वास नको’
‘उमेदवारांनी यूट्यूब वाहिन्या, समाजमाध्यमांतील बातम्या, अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना आणि माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार जबाबदार असतील, याची नोंद घ्यावी,’ असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.