पुणे : समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठीचे निकष बदलण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी पूर्वी १७ निकष निश्चित करण्यात आले होते. पूर्वीच्या निकषांतील काही निकष कायम ठेवून आता काही नव्या निकषांचा समावेश करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. २८ जून २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे नाव बदलून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार असे करण्यात आले. तसेच पुरस्कारांसाठीचे निकषही बदलण्यात आले होते. आता तीन वर्षांनी पुन्हा या निकषांत बदल करण्यात आले आहेत.
नव्या निकषांमध्ये शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक संशोधनपर प्रबंधास पुरस्कार, शिक्षकाच्या विविध क्षेत्रातील योगदानासाठी शासकीय किंवा शासन पुरस्कृत संस्थेकडून पुरस्कार, शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून गेल्या पाच वर्षांत मिळवलेले योगदान, ग्रंथलेखन, प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक, सुलभक म्हणून काम, शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण, राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला स्वत:च्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य, मागील पाच वर्षांत गावातील, परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थानिक डीएड, बीएड. धारक उमेदवारांना प्रेरक म्हणून तयार करणे, शाळेत आनंददायी वातावरण निर्मिती, शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळ, ॲपवर आपल्या विषयाच्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये सहभाग, विद्यार्थ्यांची चाचणी, शैक्षणिक स्पर्धांतील विद्यार्थ्यांचा सहभाग, मागील पाच वर्षांत शाळेच्या पटसंख्येत झालेली वाढ, उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम, आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करण्यासाठी निवड, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीत योगदान, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे गेल्या पाच वर्षांत आयोजित ऑनलाइन अभ्यासक्रम निर्मिती, प्रशिक्षणे, उपक्रम, सर्वेक्षण, प्रकल्पात सहभाग, मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल असे नवे निकष निश्चित करण्यात आले आहेत.
या निकषांवर १०० गुणांसाठी शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर ३८, माध्यमिक स्तरावर ३९, आदिवासी क्षेत्रासाठी १९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी ८, कला-क्रीडा विशेष शिक्षक पुरस्कारासाठी २, दिव्यांग शिक्षक १, स्काऊट-गाईड २ या प्रमाणे एकूण १०९ पुरस्कारांसाठी शिक्षकांची शिफारस करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. पुरस्कारासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर पूर्वीप्रमाणे निवड समिती असणार आहे. तसेच मे महिन्यात ऑनलाइन नामांकन नोंदणी सुरू करून जूनमध्ये जिल्हा समितीद्वारे नामांकनाची पडताळणी, जुलैमध्ये राज्यस्तर पडताळणी, ऑगस्टमध्ये नामांकन अंतिम करून राज्य शासनाला सादर करणे, सप्टेंबरमध्ये पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.