पुणे : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना थेट उद्योगांमध्ये कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्य़मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. मात्र, या योजनेतील उमेदवार खासगी उद्योगांमध्ये कमी आणि सरकारी कार्यालयांमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे या योजनेचा हेतू यशस्वी होत नसल्याने ती बंद करण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी योजना बंद करणार नसल्याचे रविवारी स्पष्ट केले. मात्र, योजनेत मोठे बदल करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगार इच्छुक युवक-युवती आणि उद्योजक आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न होता. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा देण्यात येते. प्रत्यक्षात या योजनेअंतर्गत सरकारी आणि निमसरकारी कार्यालयात कार्यरत उमेदवारांची संख्याच जास्त असून, खासगी उद्योगांमध्ये कार्यप्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची संख्या अतिशय नगण्य आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा म्हणाले की, या योजनेचा मूळ हेतू तरूणांना खासगी उद्योगांमध्ये कार्यप्रशिक्षण मिळावे, हा होता. मात्र, तो हेतू यशस्वी होताना दिसत नाही. सध्या या योजनेला तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली आहे. ही योजना बंद केली जाणार नाही. भविष्यात या या योजनेत मोठे फेरबदल केले जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत या नव्या स्वरूपातीला योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर तिची अंमलबजावणी केली जाईल.
पुण्यातही प्रमाण कमीच
पुणे जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तीनशेहून अधिक आस्थापनांमध्ये ३ हजार ५८८ प्रशिक्षणार्थींना संधी मिळाली. यापैकी ९० टक्के प्रशिक्षणार्थी हे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये सध्या कार्यरत आहेत. केवळ १० टक्के प्रशिक्षणार्थी खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत असून, त्या प्रामुख्याने शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना स्वच्छतेसह इतर सेवा देणाऱ्या क्षेत्रातील आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना नव्या स्वरुपात लवकरच सुरू केली जाणार आहे. यातील उमेदवारांसाठी सरकारी आणि खासगी उद्योगांतील प्रमाण निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे खासगी उद्योगांमध्ये जास्तीतजास्त तरूण कार्यप्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम होतील. – मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग