पुणे : पावसाळा सुरू झाल्याने राज्यभर वृक्षारोपण कार्यक्रमांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राज्यातील अकृषी, अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५अखेरपर्यंत केलेली वृक्ष लागवड आणि संगोपनाची माहिती सादर करावी लागणार आहे.

उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी विभागीय सहसंचालकांना परिपत्रकाद्वारे या बाबतचे निर्देश दिले आहेत. ‘मुख्यमंत्र्यांनी २०२५मध्ये किमान १० कोटी वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यामध्ये या पूर्वीही ५० कोटी वृक्ष लागवड करण्याबाबतची योजना अंमलात आणली होती. त्या अनुषंगाने राज्यातील अकृषी, अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५अखेरपर्यंत किती वृक्ष लागवड केली, कोणत्या ठिकाणी करण्यात आली, वृक्ष लागवडीसाठी करण्यात आलेल्या खर्चाची नोंद कोणत्या लेखाशीर्षाखाली करण्यात आली, सन २०१९-२० या वर्षी वृक्ष लागवड व संगोपन या उद्देशासाठी निर्माण करण्यात आलेल्या लेखाशीर्षाखाली अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली किंवा कसे, किती अनुदान रकमेची मागणी करण्यात आली या बाबतची माहिती वर्षनिहाय सादर करावी, असे डॉ. बच्छाव यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. विभागीय सहसंचालकांनी आपल्या कार्यासनाची, विद्यापीठांची, शासकीय आणि अशासकीय महाविद्यालयांची माहिती स्वतंत्रपणे सादर करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.