पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात पुणे विभागाचा निकाल ९१.३२ टक्के लागला. गेल्यावर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल तीन टक्क्यांनी घटला असून, विभागात ९४.८७ टक्क्यांसह पुणे जिल्ह्याने अग्रस्थान पटकावले. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.
पुणे विभागीय मंडळाने बारावीच्या निकालाची माहिती दिली. विभागातील २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थ्यांपैकी २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. तर पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यंदा पुणे जिल्ह्याचा निकाल ९४.८७ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ८६.३४ टक्के, तर सोलापूर जिल्ह्याचा ८८.३२ निकाल लागला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा एकूण निकालात घट झालेली असताना विभागातील पुणे, सोलापूर, अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यांच्या निकालातही घट झाली आहे.
पुणे जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९४.८७ टक्के अर्थात १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ९३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सोलापूर जिल्ह्यात ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९७.०१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.३२ टक्के, कला शाखेचा ७४.२४ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा ८४.१५ टक्के, आयटीआयचा ७२.०३ टक्के निकाल लागला आहे.
गैरप्रकारांमध्ये घट
कॉपीमुक्त अभियानामुळे विभागातील गैरप्रकारांची संख्या यंदा कमी झाल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी विभागात ९५ गैरप्रकारांची नोंद झाली होती. तर यंदा ६६ गैरप्रकार नोंदवण्यात आले असल्याची माहिती मंडळाने दिली.
विभागाची घसरण राज्यातील विभागनिहाय निकालात पुणे विभागाची घसरण झाली आहे. नऊ विभागांमध्ये पुणे विभाग सहाव्या स्थानी गेला आहे. गेल्यावर्षी पुणे विभाग तिसऱ्या स्थानी होता. तसेच आजवर पुणे विभाग नेहमीच पहिल्या तीन विभागांमध्ये असायचा.