पुणे : राज्यात हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. वेळेवर अवयव न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे अवयवदान चळवळीत आणखी वाढ करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अवयवदान पंधरवडा रविवारपासून सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून अवयवदानास प्रोत्साहन दिले जाणार असून, गरजू रुग्णांना लवकरात लवकर अवयव मिळावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वत: अर्ज भरून अवयवदानाची शपथ घेतली आणि या अवयवदान पंधरवड्याचा रविवारी प्रारंभ केला. नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन अवयवदानाची शपथ घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केले. ‘अंगदान जीवनदान संजीवनी’ अभियानांतर्गत राज्यात ३ ते १५ ऑगस्टदरम्यान अवयवदान पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत जनजागृती व समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या मोहिमेत शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, आरोग्य संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. अवयवदान क्षेत्रात देश आणि राज्य स्तरावर काम करणाऱ्या संस्था प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समित्या (रोट्टो), राज्य अवयव प्रत्यारोपण समिती (सोट्टो), विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या (झेडटीसीसी) यांच्या सहकार्याने हे अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून अवयवदानासंबंधी भीती आणि गैरसमज दूर करून वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. या पंधरवड्यात राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका व आरोग्य संस्था स्तरावर, शाळा, महाविद्यालये येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्टला जिल्हा स्तरावर अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून मोहिमेला प्रेरणादायी रूप दिले जाणार आहे.
मूत्रपिंडांची सर्वाधिक गरज
राज्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या तब्बल ७ हजार २७१ आहे. त्याखालोखाल यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची संख्या १ हजार ८८३ आहे. त्यानंतर हृदय १२२, फुफ्फुस ३८, मूत्रपिंड व स्वादुपिंड ३२, लहान आतडे ५, हात ९, मूत्रपिंड व यकृत ३८, हृदय व फुफ्फुस १८, हृदय व मूत्रपिंड १ आणि स्वादुपिंड ६ एवढे रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्ण
विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती – रुग्ण
मुंबई – ४६९४
पुणे – २९२१
नागपूर – १३२४
छत्रपती संभाजीनगर – ४८४
एकूण – ९४२३