पुणे : शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत असताना वाहतूक पोलिस मात्र सतत वर्दळीचा असलेला कर्वे रस्ता सर्रासपणे व्हीआयपी रस्ता असल्याचे कारण देऊन वाहतुकीसाठी बंद करतात. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला असून, कर्वे रस्ता व्हीआयपी कधी झाला, अशी विचारणा वाहतूक पोलिसांना केली आहे.
मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना या संदर्भात पत्र दिले आहे. कर्वे रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा व्यावसायिक व निवासी परिसर आहे. या रस्त्यावरून वारंवार ‘व्हीआयपी’चा ताफा जात असतो. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. विशेषतः कोथरूडला जाण्यासाठी कर्वे रस्ता हा मुख्य मार्ग आहे. मात्र, अचानक ‘व्हीआयपी’ ताफा निघाला, की नागरिकांना रस्त्यावर ताटकळत थांबावे लागते. यामुळे वाहतूक कोंडी होते.
‘पूर्वी केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासाठीच अशा प्रकारच्या व्हीआयपी हालचालींना प्राधान्य दिले जात होते. मात्र, आता स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या ताफ्यांमुळे नागरिक, वाहनचालक आणि व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. कर्वे रस्ता व्हीआयपी कधी झाला, असा प्रश्नही संभूस यांनी विचारला आहे. कायद्यामध्ये ‘व्हीआयपी’साठी कायमस्वरूपी रस्ता मोकळा ठेवण्याची कोणतीही तरतूद नाही.
शासनाच्या आदेशाविना अशी कारवाई नियमबाह्य आहे. त्यामुळे ही पद्धत तातडीने थांबवावी. राज्य सरकारच्या लेखी आदेशाशिवाय वाहतूक पोलिसांनी शहरातील कोणताही रस्ता व्हीआयपी रस्ता म्हणून घोषित करू नये,’ अशी मागणी संभूस यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.