राज्यातील धरणांत गेल्यावर्षीइतका पाणीसाठा 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात राज्यात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. यंदा कोकण विभागासह मराठवाड्यातही सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून, सर्व धरणांत मिळून गतवर्षीच्या बरोबरीने ८४ टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे. 

सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत राज्यातील सर्वच विभागाने पावसाची सरासरी पूर्ण केली. त्याचप्रमाणे धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली. सप्टेंबरमधील पावसाने राज्यातील धरणांत २० टक्क्यांहून अधिक पाणीसाठ्याची भर घातली आहे.

राज्यात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के अधिक पाऊस झाला असला, तरी यंदाही पावसाचे असमान वितरण आणि एकाच भागांत कमी वेळेत मोठ्या पावसाचे वैशिष्ट्य कायम राहिले. मराठवाड्यातील पाऊस सरासरीच्या तुलनेत ४८ टक्के अधिक असून, कोकण विभागात तो २४ टक्क्यांनी अधिक आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भात मात्र सरासरी पूर्ण करून तो तीन टक्क्यांनी पुढेच गेला आहे. राज्यातील धरणांत ३० सप्टेंबरपर्यंत ८३.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला. गेल्यावर्षी याच दिवशी तो ८४.४८ टक्के होता.

सर्वाधिक पावसाच्या यादीत मराठवाडा

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात दाणादाण उडाली. याच पावसामुळे मराठवाड्याचा समावेश देशातील सर्वाधिक पावसाच्या विभागात झाला आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाला असून, तो सरासरीपेक्षा तब्बल ८२ टक्क्यांनी अधिक आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra record more rainfall than their annual quota zws
First published on: 01-10-2021 at 04:53 IST