पुणे : विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील संशोधनाला बळ देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सुरू केलेल्या ‘स्ट्राईड’ (स्कीम फॉर ट्रान्स डिसिप्लिनरी रीसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी) या योजनेत राज्यातील सहा शिक्षण संस्थांची निवड झाली आहे. त्यात एक विद्यापीठ आणि पाच महाविद्यालयांचा समावेश आहे.
पारंपरिक शिक्षण शाखांची चौकट मोडून नव्या संकल्पनांवर आधारित संशोधन करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानंतर प्रस्तावांची छाननी करून ‘विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील संशोधन क्षमतावृद्धी’ या पहिल्या टप्प्यासाठीची निवड यादी यूजीसीने जाहीर केली. त्यात देशभरातील १६ अनुदानित विद्यापीठे आणि १८ अनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे. तर विशाखापट्टणमच्या विग्नान्स इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेची स्वयंअर्थसहाय्यित संशोधनासाठी ‘यूजीसी स्ट्राईड सेंटर फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
योजनेत राज्यातील एक विद्यापीठ आणि पाच महाविद्यालयांची निवड झाली. त्यात विद्यापीठांच्या गटात कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, महाविद्यालयांच्या गटात पुण्याचे फग्र्युसन महाविद्यालय, विनायकराव पाटील महाविद्यालय, केआरटी कला, बीएच वाणिज्य आणि एएम विज्ञान महाविद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, मुंबईचे डॉ. भानूबेन महेंद्र नानावटी गृहविज्ञान महाविद्यालयाची निवड झाली आहे. निवड झालेल्या संस्थांना संशोधनासाठी यूजीसीकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
‘संशोधनासाठी प्राध्यापकांची क्षमतावृद्धी, विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लावण्यासाठी आणि एकूणच संशोधन संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत महाविद्यालये आणि विद्यापीठे मिळून जवळपास चारशे प्रस्ताव आले होते. त्यातून प्रस्तावांची निवड करण्यात आली. आता संशोधनसाठी लागणारा निधी संबंधित संस्थांना दिला जाणार आहे. प्रत्यक्ष संशोधनासाठी काम करण्याचा योजनेद्वारे प्रयत्न केला जाईल. तसेच संशोधनाची आणि पर्यायाने शिक्षणाचीही गुणवत्ता उंचावण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे.
– डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग