पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती. मात्र आता निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरती प्रक्रियेला परवानगी दिली असून, आता पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पवित्र संकेतस्थळाद्वारे २५ फेब्रुवारी २०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन, जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. दरम्यान, केेंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली.
हेही वाचा : “अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’पणा ठासून भरला आहे म्हणूनच…”, शिवाजी आढळराव पाटील यांचे अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर
आचारसंहिता कालावधीत नियुक्तीच्या प्रक्रियेवर निर्बंध आले. या विषयीची तातडी, तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केेंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. या संदर्भात केेंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीबाबतची कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे, असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास १९ एप्रिल रोजी प्राप्त झाले आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे दिली. शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्तीसंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल, असे मांढरे यांनी सांगितले.