निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांचे जे प्रेम राज ठाकरे यांनी दाखवले आहे, हा पुतनामावशीला फुटलेला पान्हा आहे आणि हे पुणेकरांनाही ठाऊक आहे. मोदींचे नाव पुढे करून प्रत्यक्षात काँग्रेस आघाडीला मदत करायची असा मनसेचा डाव आहे, अशी टीका करत महायुतीच्या नेत्यांनी मंगळवारी मनसेला लक्ष्य केले.
माझे खासदार मोदींनाच पाठिंबा देतील आणि मोदी हेच पंतप्रधान व्हायला हवेत. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची देशाला गरज आहे, असे विधान ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील जाहीर सभेत केल्यानंतर त्यांच्या या विधानांवर माजी खासदार प्रदीप रावत आणि शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. एकीकडे मोदी पंतप्रधान व्हावेत असे जाहीर सभेत सांगायचे आणि दुसरीकडे महायुतीचे अनिल शिरोळे यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा असा प्रकार मनसेकडून सुरू असून जनता सुज्ञ आहे आणि जनतेला हे सर्व कळत आहे, असे रावत म्हणाले.
स्वत:ची आणि पक्षाची भूमिका जाहीर सभेत मांडण्याऐवजी राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत जे भाषण केले त्यातून फक्त व्यक्तिद्वेषच दिसला. दोन्ही काँग्रेसच्या कारभाराला लोक विटले आहेत. त्यांना चांगला पर्याय हवा आहे आणि महायुती हाच समर्थ पर्याय आहे. अशी परिस्थिती असताना मनसेकडून जे काही सुरू आहे, तो मुद्दामहून केला जात असलेला डाव आहे, असा आरोपही रावत यांनी या वेळी केला.