पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात जुलै महिन्यामध्ये आतापर्यंत मलेरियाचे चार, तर डेंग्यूचे सात रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आठ हजार घरांत डासांच्या अळ्या आढळून आल्या.
पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणावर डासोत्त्पत्ती होते. डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. पिंपरी-चिंचवड शहरात जुलै महिन्यामध्ये ११ हजार १५४ तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मलेरियाच्या १० हजार ९६२ संशयित रुग्णांपैकी चार जणांचा अहवाल सकारात्मक आला, तर डेंग्यूच्या १९१ संशयित रुग्णांपैकी सात जणांचा अहवाल सकारात्मक आला. चिकुनगुनियाचा एक संशयित रुग्ण आढळला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून, प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून शहरात डास निर्मूलन करणे असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
महापालिकेने शहरातील चार लाख ६० हजारांहून अधिक घरांची तपासणी केली. त्यांपैकी आठ हजार घरांच्या परिसरात डासांच्या अळ्या आढळून आल्या. तर, तीन हजार १५९ जणांना नोटीस बजावण्यात आली असून, १६ लाख ९२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांना अटकाव करण्यासाठी औषध फवारणीपासून दंडात्मक कारवाईपर्यंत आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
विभागाने २४ लाख पाच हजार कंटेनरची तपासणी केली. त्यांपैकी नऊ हजार २०० कंटेनरमध्ये डासवाढीस पोषक स्थिती आढळून आली. एक हजार ६६ भंगार दुकाने आणि एक हजार ४८१ बांधकाम स्थळांची पाहणी पथकामार्फत करण्यात आली. तीन हजार १५९ आस्थापना, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार व व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे, तर शहरात विविध ५०१ ठिकाणी थेट दंडात्मक कारवाई करून १६ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
डासांच्या उत्पत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांवर मात करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घर आणि आजूबाजूला पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. – सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.