वारजे भागातील घटना
पुणे : दुचाकीतून पेट्रोल चोरल्याचा आरोप करून एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी चौघा जणांविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत अच्युतराव ढाकणे (वय ३५, रा. गुरुकृपा वॉशिंग सेंटर, वारजे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत ढाकणेचा मित्र संजय भीमराव ऐवाळे (वय ३८, सध्या रा. म्हाडा वसाहत, वारजे, मूळ रा. जत, जि. सांगली) याने यासंदर्भात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ऐवाळेने दिलेल्या फिर्यादीनुसार मोटारीतील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐवाळे ट्रकचालक आहे. ढाकणे वारजे भागातील डुक्करखिंड परिसरातील एका वॉशिंग सेंटरमध्ये गेल्या महिन्याभरापासून काम करत होता. ऐवाळे आणि ढाकणेची महिन्याभरापूर्वी ओळख झाली. टाळेबंदीत दोघांना सध्या काम नसल्याने दोघांचा परिचय वाढला. ऐवाळेची दुचाकी ढाकणे वापरायचा.
मंगळवारी सायंकाळी ऐवाळेच्या दुचाकीच्या टाकीत पेट्रोल कमी होते. त्याने ढाकणेला पेट्रोल मिळेल का? अशी विचारणा केली.त्यानंतर ढाकणे काम करत असलेल्या वॉशिंग सेंटरजवळ एक दुचाकी लावण्यात आली होती. दुचाकीचा मालक माझ्या ओळखीचा आहे.
मी दुचाकीतून पेट्रोल काढून देतो, असे ढाकणेने ऐवाळेला सांगितले. त्यानंतर ढाकणेने दुचाकीतील पेट्रोल बाटलीत काढण्यास सुरुवात केली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास काळ्या रंगाच्या मोटारीतून चौघेजण आले. चौघांनी ढाकणेला लाथाबुक्क्य़ांनी बेदम मारहाण केली आणि चौघेजण मोटारीतून पसार झाले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ढाकणेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यरात्री वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या चौघांचा शोध घेण्यात येत आहे.