पुणे शहरामध्ये धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या (पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या) बसमधून प्रवास करताना बसच्या दुर्दशेमुळे एका प्रवाशाची पॅन्ट फाटल्याची घटना आज सकाळी घडले. या प्रकारामुळे संतापलेल्या या प्रवाशाने पीएमपीएमएलविरोधात थेट पोलिसांकडे तक्रार केली असून झालेली नुकसान भरपाई पीएमपीएमएलने भरून देण्याची मागणी केली आहे. शिवाजीनगरहून जांभूळवाडीला जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसमध्ये हा प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळच्या सुमारास कात्रजला जाण्यासाठी बिबवेवाडी बस स्टॉपवर संजय शितोळे हे पीएमपीएमएलच्या शिवाजीनगर- जांभूळवाडी बसमध्ये चढले. ते ज्या आसनावर जाऊन बसले. आपल्या गंतव्यस्थानी पोहचले असता ते जागेवरून उठले असता त्यांची पॅन्ट आसनाच्या इथे बाहेर आलेल्या धातूच्या पट्टीला लागून फाटली. त्यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार बस कंडक्टरकडे केली. मात्र कंडक्टरने यामध्ये आपली काहीच चूक नसल्याचे सांगत संजय यांना संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्यास सांगितले. मात्र कंडक्टर आणि संजय यांच्यातील बाचाबाची वाढल्यानंतर बस थेट कात्रज पोलीस चौकीमध्ये नेण्यात आली. तेथे दोन्ही बाजूचे म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतले. अखेर संजय यांनी पीएमपीएमएल प्रशासनाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीएमपीएमएलने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संजय यांनी केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतरच बस जांभूळवाडीकडे रवाना झाली. आता या प्रकरणात पीएमपीएमएल काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

एकंदरीतच पीएमपीएमएलच्या प्रवासात प्रशासनाकडून सुविधा कमी आणि समस्या अधिक असल्याची तक्रार पुणेकर कायमच करत असतात. रोजच्या प्रवासात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अगदी तुटलेल्या आसनांपासून ते बस बंद पडण्यापर्यंत अनेक गोंधळ वरचेवर घडतच असतात. मात्र अनेक प्रवाशी कोणत्याही प्रकारची तक्रार न करता प्रवास करतात आणि खूपच कमी जण प्रशासनाविरोधात औपचारिक तक्रार करतात. त्यामुळेच संजय यांनी केलेल्या या तक्रारीची सध्या पुणे परिसरामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून जोरदार चर्चा सुरु आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man files compliant against pmpml management as his pant tear due to badly maintained buses
First published on: 17-01-2018 at 16:05 IST