पुणे : मैत्रिणीची छेड काढल्याने झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना जांभूळवाडी तलावाच्या परिसरात घडली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रोहित नामदेव ढमाळ (रा. योगमुद्रा बिल्डिंग, भूमकर वस्ती, नऱ्हे, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सूरज गणेश सूर्यवंशी (रा. गणेश पेठ) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर (वय २१, रा. प्रतीक हाइट्स, पारी कंपनीजवळ, नऱ्हे, सिंहगड रस्ता) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज, दीपक, रोहित हे मित्र आहेत. मैत्रिणीची छेड काढण्यावरून रोहित आणि सूरज यांच्यात वाद झाला होता. रोहित, सूरज, दीपक हे शनिवारी (१४ जून) रात्री साडेदहाच्या सुमारास आंबेगाव परिसरातील जांभूळवाडी तलावाजवळ गेले होते. तेथे सूरज, रोहित यांच्यात वाद झाला. वादातून सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घातला.

गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दीपकने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या सूर्यवंशीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक गोरे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.